कऱ्हाड : मसूर, वडूज, पुसेसावळीतील दरोडा उघड

एलसीबीने आवळल्या पाच जणांच्या मुसक्या दोन घरफोड्याही उघडकीस, तीन ठिकाणी कारवाई
टोळीतील पाच जणांना अटक
टोळीतील पाच जणांना अटकsakal

कऱ्हाड: मसूरसह वडूज व पुसेसावळी येथे तीन वेगवेगळ्या सशस्त्र दोरड्यांत ११ लाख १४ हजारांचा ऐवज लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने (एलसीबी) मुसक्या आवळल्या आहेत. जानेवारीपासून जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरू होते. त्या तिन्ही दरोड्यांचा एलसीबीच्या पथकाने अथक परिश्रमाने छडा लावला आहे. एलसीबीच्या पथकाने नगर जिल्ह्यात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत नगर जिल्ह्यातील पाच दरोडेखोरांच्या टोळीला गजाआड केले आहे. एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने कर्जत (जि. नगर) येथे छापे टाकून काल रात्री उशिरा कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. छाप्यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही दरोडेखोरांना पाठलाग करून अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले, की अविनाश ऊर्फ कल्या सुभाष भोसले (वय २४), अजय सुभाष भोसले (२०) व सचिन सुभाष भोसले (२०, तिघे रा. माही, जि. नगर), राहुल ऊर्फ काल्या पदू भोसले (२४, रा. वलूज, जि. नगर) होमराज उद्धव काळे (२५, रा. आष्टी, जि. बीड) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. त्यांना कर्जत परिसरात छापा टाकून अटक केली आहे. पाचही जणांना नगर येथून ताब्यात घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाडसी कारवाई केली.

एकाच वेळी नगर जिल्ह्यातील तीन ठिकाणी छापे टाकत कारवाई करीत अट्टल दरोडेखोर ताब्यात घेतले. कारवाईमुळे जिल्ह्यातील दरोड्यांचे सत्र थांबण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अटक केलेल्या टोळीने मसूरसहित पुसेसावळी, वडूज येथील तिन्ही दरोड्यांची कबुली दिली आहे. त्याशिवाय दहिवडी, वडूज येथील घरफोड्यांचीही कबुली दिल्याने तीन दरोड्यांसह पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. पुसेसावळी येथे पाच जानेवारीला दरोडा पडला होता. त्यात पाच जणांच्या टोळीने पुसेसावळीतील संजय कदम व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करत तब्बल पाच लाख २० हजारांची लूट केली होती. दोन मार्चला मसूरला दरोड्याची घटना झाली होती. त्यात डॉ. पूजा वारे व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून लूट झाली. त्यात चार लाख ८९ हजारांचा ऐवज लंपास झाला होता.

११ मार्चला पहाटे वडूजला शिवाजी ननावरे यांच्या घरावर दरोडा पडला होता. त्यातही मारहाण करून एक लाख पाच हजारांचा ऐवज लुटण्यात आला होता. दरोड्यांची सलग मालिकेने पोलिसांची झोप उडाली होती. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासाचे दिव्य पार करताना एलसीबीने अथक परिश्रमातून त्या तिन्ही दरोड्यासहित दोन घरफोड्यांचा तपासाचा तड लावला आहे.

तांत्रिक माहितीच्या आधारावर आष्टी- कर्जत येथे तेथील पोलिसांच्या मदतीने तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला गजाआड केले. वडूजचे पोलिस उपअधीक्षक नीलेश देशमुख, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, मालोजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक गर्जे यांच्यासह फौजदार गणेश वाघ यांच्यासह एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

तपासात तांत्रिक माहितीचा आधार

झोप उडविणाऱ्या जिल्ह्यातील दरोड्यांच्या सत्रामुळे नागरिकांत घबराट होती. पोलिसही हताश होते. त्याच वेळी पोलिसांच्या खबऱ्यांनी दिलेल्या माहितीसह पोलिसांनी दरोड्याच्या वेळी त्या- त्या भागातील मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून टोळीचा माग काढला. त्यात खात्री होताच पोलिसांनी छापा टाकून टोळीचा पर्दाफाश करत टोळीला जेरबंद केले. टोळीतील पाच जणांना अटक झाली आहे. अद्यापही तिघांचा टोळीत समावेश असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com