Ramraje Nimbalkar : 'जिरवाजिरवीचा खेळ थांबवा, या राजकारणात धोका अधिक आहे' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramraje Naik Nimbalkar

निवडणुकीला एकसंधपणे सामोरे गेल्यास राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी आहे.

Ramraje Nimbalkar : 'जिरवाजिरवीचा खेळ थांबवा, या राजकारणात धोका अधिक आहे'

पळशी (सातारा) : सध्याच्या भाजप-शिवसेनेच्या युतीकडे कार्यकर्ते कमी; पण भावनिक करण्याची क्षमता आणि कला आहे. आपल्यातील दुही हीच त्यांची शक्ती झाली आहे. त्यामुळे कोरेगाव बाजार समितीची निवडणूक माझ्या दृष्टीनं अग्निपरीक्षा आहे, असं स्पष्ट मत रामराजेंनी व्यक्त केलं.

या निवडणुकीत आपल्यामध्ये खो-खो, कबड्डीचा खेळ नको, अशा शब्दांत विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कोरेगाव तालुक्यात झालेल्या राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाचा संदर्भ देत भाष्य केलं.

कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात (Koregaon Market Committee Election) चर्चा करण्यासाठी कोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने (NCP) आयोजिलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. या वेळी आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, सुनील माने, शिवाजीराव महाडिक, बाळासाहेब सोळसकर, रामभाऊ लेंभे, तेजस शिंदे, राजाभाऊ जगदाळे, संजय साळुंखे, मंगेश धुमाळ, कांतिलाल पाटील, शहाजी क्षीरसागर, संभाजी गायकवाड, अॅड. पांडुरंग भोसले, भास्कर कदम, श्रीमंत स. झांजुर्णे, अरुण माने, सचिन साळुंखे, नाना भिलारे, अजय कदम, प्रताप कुमुकले आदी प्रमुख उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘‘सध्या पाय ओढण्याचे व जिरवाजिरवीचे राजकारण गावागावांत सुरू आहे. त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष घेत आहे. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे. आपण आपल्यातीलच जिरवाजिरवीच्या राजकारणासाठी सुरू असलेला खो-खो, कबड्डीचा खेळ थांबविला पाहिजे. कारण या राजकारणामध्ये धोका अधिक आहे. माझ्यासह शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, नितीन पाटील, असे आम्ही सर्व जण एकत्रित आहोत. एकसंधपणे या निवडणुकीला सामोरे जाऊ या.’’

शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. कायदे बदलून या संस्थेचे अस्तित्व संपविण्याचा सध्याच्या सरकारचा डाव आहे. या निवडणुकीला एकसंधपणे सामोरे गेल्यास राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी आहे. हितसंबंधांपेक्षा आपल्यासाठी राष्ट्रवादी पक्ष महत्त्वाचा आहे. आम्ही चौघे जण एकत्र आहोत, आमच्यात बेबनाव नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस, तसेच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाशी चर्चा करण्याचे आणि एकूणच या निवडणुकीसंदर्भातील सर्वाधिकार आपण रामराजे यांना देऊयात. आपण सर्व जण एकत्रितपणे लढल्यास समोरच्यांनी निवडणुकीतील कोणतीही आयुधे वापरल्यास राष्ट्रवादीचा विजय निश्चित आहे.’’

आमदार पाटील म्हणाले, ‘‘घेवड्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कोरेगाव बाजार समितीची ओळख आहे. या निवडणुकीला सर्वांनी एकत्रितपणे सामोरे जाऊन या बाजार समितीमध्ये पुन्हा शरद पवार यांच्या विचारांची सत्ता आणूया.’’ आमदार दीपक चव्हाण, शिवाजीराव महाडिक, बाळासाहेब सोळसकर यांची भाषणे झाली. राहुल साबळे यांनी स्वागत केले. श्रीमंत नि. झांजुर्णे यांनी आभार मानले.