'कृष्णा'चा ऊस वाहतुकदारांसाठी 'गाेड' निर्णय

अमोल जाधव | Thursday, 22 October 2020

आता कारखान्याचा महत्त्वाचा दुवा असणाऱ्या ऊसतोडणी वाहतूकदारांच्या हिताचा निर्णय घेण्यातही कृष्णा कारखान्याने एक पाऊल पुढे टाकले आहे. ऊस वाहतूक दरामध्ये भरघोस वाढ मिळाल्याने वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : ऊस वाहतूक करणाऱ्या चारचाकी ट्रॅक्‍टर व ट्रक वाहतुकीच्या दरात 17 टक्‍क्‍यांची भरघोस वाढ करण्याचा निर्णय येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी नुकताच जाहीर केला आहे.
 
दर वर्षी गळीत हंगामात कृष्णा सहकारी साखर कारखान्यास लागणाऱ्या उसाची वाहतूक ऊसतोडणी वाहतूकदार करत असतात. ऊस वाहतूकदार हा कारखान्याचा महत्त्वाचा दुवा असून, गळीत हंगाम यशस्वी करण्यात या वाहतूकदारांचे मोलाचे योगदान असते. कृष्णा कारखान्याला ऊस वाहतूक करणारे वाहतूकदार हे बहुतांश कारखान्याचे सभासद आहेत. शेतीबरोबरच जोड व्यवसाय करण्यासाठी शेतकरी ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतात. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी डॉ. भोसले यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने विशेष प्रयत्न केले आहेत. तोडणी यंत्रणेत पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नोटराईज्ड ई-करार प्रणाली राबविण्यात आली.

गुणवंतांच्या पाठीवर गोडबोले ट्रस्टची थाप; तीन लाखांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

ज्यामुळे ऊस वाहतूकदारांच्या करारात पारदर्शकता आली. ऊस वाहतूकदारांना सातत्याने चांगली दरवाढ देण्याचा प्रयत्न कारखान्याने केला आहे. याआधी 2017-18 च्या हंगामात वाहतूकदारांना प्रतिटन वाहतुकीस दरवाढ देत दिलासा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा यंदाच्या हंगामापासून ऊस वाहतूकदारांना 17 टक्‍क्‍यांची भरघोस वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृष्णा कारखाना सभासदांना चांगला दर देण्यात अग्रेसर राहिला आहे. कामगारांचे कल्याणही प्रशासनाने नेहमीच जपले असून, आता कारखान्याचा महत्त्वाचा दुवा असणाऱ्या ऊसतोडणी वाहतूकदारांच्या हिताचा निर्णय घेण्यातही कृष्णा कारखान्याने एक पाऊल पुढे टाकले आहे. ऊस वाहतूक दरामध्ये भरघोस वाढ मिळाल्याने वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Edited By : Siddharth Latkar