पावसाच्या तडाख्याने बळिराजा कोलमडला; सातारा जिल्ह्यात अतोनात नुकसान

हेमंत पवार
Tuesday, 29 September 2020

दरवर्षी दुष्काळाच्या झळांत असणाऱ्या माण तालुक्‍यालाही यंदा पावसाचा फटका बसला. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचा कांदा नासला आहे, तर बाजरी पडून नुकसान झाले आहे. मका, उडीद, घेवडा, मूग या पिकांचेही नुकसान झाले. भिलारमध्ये स्ट्रॉबेरी, मेढ्यात भात, खटाव व कोरेगाव तालुक्‍यात बटाटा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वाई तालुक्‍यात बटाटा, सोयाबीन, भुईमूग, घेवड्याला फटका बसला आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : चांगल्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम चांगला जाईल, या आशेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. हंगामात टप्प्याटप्प्याने पडलेल्या पावसावर पिकेही जोमात आली. मात्र, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिके वाया जावून बळिराजाचे कंबरडेच मोडले आहे. मोठ्या हिमतीने घेतलेली पिके त्यांच्या डोळ्यादेखत वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. 

सातारा जिल्हा हा खरिपातील पिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी जिल्ह्यात पाऊसमान चांगले असते. त्यामुळे पिकांची पेरणीही चांगली होते. त्यातून शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात. दरवर्षी पावसावर अवलंबून असणाऱ्या खरीप हंगामात चांगला पाऊस होऊन उत्पादन मिळेल, या आशेवर शेतकरी बॅंका, सोसायट्या, पतसंस्थांची कर्जे घेऊन, उसने करून, प्रसंगी सावकारी कर्ज घेत पेरणी करतात. दरवर्षी जिल्ह्यात सोयाबीन, भात, मका, उडीद, घेवडा, मूग, बटाटा, कडधान्य, तृणधान्यासह अन्य पिकांची पेरणी करतात. टप्प्याटप्प्याने पडणाऱ्या पावसाने पिकांची वाढही चांगली होते. यंदा मात्र खरीप हंगामात पिकांना पोषक असा पाऊस झाला. त्यावर पिके चांगली तरारुन आली. मात्र, काढणीच्या टप्प्यात परतीच्या पावसाने त्यावर पाणी फिरवले आहे. 

बटाट्याच्या उत्पन्नात निम्म्याने घट, शेतकऱ्यांवर कोसळले आर्थिक संकट!

दरवर्षी दुष्काळाच्या झळांत असणाऱ्या माण तालुक्‍यालाही यंदा पावसाचा फटका बसला. सततच्या पावसाने शेतकऱ्यांचा कांदा नासला आहे, तर बाजरी पडून नुकसान झाले आहे. मका, उडीद, घेवडा, मूग या पिकांचेही नुकसान झाले. भिलारमध्ये स्ट्रॉबेरी, मेढ्यात भात, खटाव व कोरेगाव तालुक्‍यात बटाटा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वाई तालुक्‍यात बटाटा, सोयाबीन, भुईमूग, घेवड्याला फटका बसला आहे. कऱ्हाड-पाटण तालुक्‍यात सोयाबीन आणि भुईमुगाचे नुकसान झालेले दिसते. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील खटाव, कोरेगाव, वाई तालुक्‍यांत बटाट्याची मोठ्या प्रमाणात लागण करण्यात येते. बटाट्यावर सध्या करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. 

पोटात वाढवलेलं बाळ मला कोरोनाशी झुंजायला बळ देत होतं!

पंचनामे सुरू करण्याची गरज 
जिल्ह्यात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून त्यांनी घेतलेली कर्जे भागवणेही मुश्‍किल होणार आहे. त्याचा विचार करून कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शासन दरबारी सादर करणे गरजेचे आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीतून त्यांना कर्ज भागवण्यासाठी प्रयत्न करता येतील. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large Losses To Farmers Due To Rains Satara News