वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी सरकारवर दबाव आणू; दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

बाळकृष्ण मधाळे | Thursday, 22 October 2020

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आज सातारा दौ-यावर आहेत. दरेकरांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत सातारा व जावली तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी केली. तद्नंतर त्यांनी शेतक-यांना लवकरात-लवकर मदत मिळावी यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. शेतक-यांसाठी सरकारवर दबाव आणून मदत दिली जाईल, असेही आश्वासन दरेकरांनी शेतकरी बांधवांना दिले.

सातारा : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आज (ता. २२) सातारा दौ-यावर आहेत. प्रारंभी साता-यात दाखल होताच दरेकर यांनी खासदार उदयनराजेंची भेट घेत जिल्ह्यातील पीक नुकसानीबाबत माहिती जाणून घेतली. तद्नंतर त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेत सातारा व जावली तालुक्यातील पीक नुकसानीची पाहणी केली. 

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शेतक-यांचे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. मात्र, अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निधी येथील शेतक-यांना मिळाला नाही. सातारा जिल्ह्यात भात शेतीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने पिके कुजू लागली आहेत. यावरती लवकरात-लवकर तोडगा काढणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना झाल्या नाहीत. या समस्येवर आता विरोधी पक्षनेते दरेकर यांनी तोडगा काढावा, अशी विनंती वजा मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी दरेकरेकरांकडे केली.

उदयनराजेंचे सूचक विधान लवकरच चांगले घडेल, फडणवीस आणि दरेकर राज्य ताब्यात घेतील

दरम्यान, विरोधी पक्षनेते दरेकर यांनी शेतक-यांशी संवाद साधत पीक नुकसानीची माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, शेतक-यांना लवकरात-लवकर मदत मिळावी यासाठी भाजप सरकार प्रयत्न करत आहे. शेतक-यांसाठी सरकारवर दबाव आणून मदत दिली जाईल. आज सातारा जिल्ह्यात पाहणी करत असताना पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. मात्र, आम्ही शेतक-यांसाठी लागेल ती मदत करण्यास तत्पर आहोत, असे सांगत त्यांनी शेतक-यांनी  धीर देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यावेळी प्रशासकीय यंत्रणेने पीक नुकसानीचे पंचनामे केले.