कऱ्हाड जनता बॅंकेच्या चार कर्जदारांमुळे दोन लाख ठेवीदार वेठीस
पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या, पाच जिल्ह्यातील अनेकांचा आधार बनलेल्या कऱ्हाड जनता बॅंकेची दिवाळखोरी निघाली. त्याची कारण मिमांसा होईलही, जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात कऱ्हाडचे वेगळे वलय असतानाच कऱ्हाड बॅंकेनंतर कऱ्हाड जनता सहकारी बॅंक त्याच मार्गावर गेली. त्यामागे अनेक कारणे आहेत. तीन दशकापूर्वी हर्षद मेहताने केलेल्या शेअर्स घोटळ्यात कऱ्हाड बॅंक दिवाळखोर झाली. मात्र, कऱ्हाड जनता बॅंकेच्या दिवाळखोरीला अनेक कारणे आहेत. त्या कारणांची मिमांसा करणारी वृत्तमालिका आजपासून....
कऱ्हाड (जि. सातारा) : नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असलेल्या कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेच्या कारभाराला अखेर काल रिझर्व्ह बॅंकेनेच पुढाकार घेत पूर्णविराम दिला. सहकार खात्याने बॅंक दिवाळखोरीत आल्याचे जाहीर करत अवसायानिक तेथे नेमला. एका दिवसात बॅंकेची दिवाळखोरी जाहीर झाली नाही, अनेक वर्षांपासूनच्या चुकांचे एकत्रीकरण झाल्याने कऱ्हाड जनता बॅंक दिवाळखोर ठरली. त्यामध्ये केवळ चारच कर्जदार असे आहेत. ज्यांच्या थकीत कर्जाची रक्कन 522 कोटींच्या आसपास आहे, जी बॅंकेने वसूलच केलेली नाही. त्यातही दोघांना विनातारण कर्जे दिली. त्याची रक्कमही कित्येक कोटींत थकीत आहे. त्यामुळे कर्ज देण्याची मर्यादा असतानाही त्या नियमांना डावलून दिलेल्या कर्जाचा डोंगर बॅंकेच्या दिवाळाखोरीस कारणीभूत ठरला.
कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेची स्थापना 1962 मध्ये झाली. बॅंक परवाना त्यांना 1986 मध्ये मिळाला. त्यानंतर बॅंकेने विशेष प्रगती केली. मात्र, त्यामध्ये 1990 नंतर होणारा कारभार अधिक चर्चैचा ठरला. त्यानंतरच्या कालावधीत कऱ्हाड जनता बॅंकेला उपनिबंधक कार्यालय, सहकार खाते, रिझर्व्ह बॅंकेककडून वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न झाला, त्याकडे विशिष्ठ चष्म्यातून पाहणाऱ्या संचालक मंडळांच्या कारभाऱ्यांचा बेफीकरपणाही तितकाच कारणीभूत ठरला आहे. त्यामुळे कर्जे थकत गेली. मंजूर मोठ्या कर्जाच्या रक्कम एकाच दमात देण्याची त्यांची पद्दतही बॅंकेला गोत्यात आणणारी ठरली आहे. मोठी कर्जे देताना बोगस कागदपत्रे करणे, नियमबाह्य आणि विनातारण कर्ज वाटणे अशा अनेक कारणांनी दिलेली कर्जे बॅंकेच्या विविध अवैध व्यवहाराला अधोरेखीत करत गेली. त्यामुळेही अनेक गैरप्रकार स्पष्ट होत गेले. त्यामुळेच रिझर्व्ह बॅंकेला ठेवीदारांच्या फायद्यासाठी निर्णय घ्यावा लागला, असे आदेशात स्पष्ट नमूद केले आहे. कऱ्हाड जनता बॅंकेच्या ठेवीदारांची संख्या दोन लाख तीन हजार 301 इतकी आहे. त्यांच्या ठेवींचा आकडा 511 कोटी 39 लाख आठ हजार आहे. त्यामध्ये 429 कोटी 43 लाख 67 हजारांच्या ठेवी पाच लाखांच्या आतील आहेत. तर 587 ठेवीदारांच्या ठेवी 81 कोटी 95 लाख 41 हजारांच्या आहेत. मात्र, त्या उलट चारच कर्जदारांच्या थकीत कर्जाचा आकडा 522 कोटींवर गेला आहे. मात्र, त्यांच्याकडे वसुलीचा काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे बॅंकेच्या 577 कोटींच्या ठेवींच्या बदल्यात दिलेल्या थकीत कर्जाची रक्कम जवळपास मॅच होत गेली. त्यामुळेही आर्थिक कोडी निर्माण झाली. त्याचा परिणाम बॅंकेच्या व्यवहारावर झाल्यानेच बॅंकेवर दिवाळखोरीची वेळ आली.
दीड वर्षात कऱ्हाड तालुक्यातील तब्बल 53 सहकारी संस्था दिवाळखोरीत!
उद्योजकांना विनातारण तर कारखानदारांचे कर्जदार फरारी
कऱ्हाड जनता सहकारी बॅंकेने चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यास 45 कोटी, कडेगाव येथील डोंगराई सहकारी साखर कारखान्यास 55 कोटी, सांगली येथील फडतरे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला 112 कोटी आणि कऱ्हाडातील बिजापुरे ग्रुपला 98 कोटींची कर्जे दिली. त्या सगळ्याची कर्जे सध्या थकीत आहेत. त्यामुळे आजची थकीत कर्जाची वसुली 522 कोटीवर गेली आहे. त्यात फडतरे ग्रुपचे थकीत कर्जे 201 कोटी, बीजापुरे ग्रुपचे थकीत कर्ज 110 कोटी, डोंगराईचे थकीत कर्ज 153 कोटी तर जरंडेश्वरचे थकीत कर्ज 58 कोटीवर गेले आहे. वास्तविक त्या सगळ्यांच्या न्यायालयीन लढाया सुरू आहेत. यातील बीजापुरे व फडतरे यांना विनाताराण कर्ज दिले आहेत. डोंगराई व जरंडेश्वरला कर्ज देताना तारण आहे. डोंगराईचे कर्ज ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदारांना दिले त्या कर्जात 104 लोकांचा समावेश आहे. त्यातील सर्वच लोक बेपत्ता आहेत. जरंडेश्वरलाही ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदारांना कर्ज वाटप केले आहे. त्याही कर्जात 157 लोकांचा समावेश आहे. त्यातील कोणी सापडत नाही, अशी स्थिती आहे. (क्रमशः)
संपादन : बाळकृष्ण मधाळे