महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलग सुट्यांमुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून

महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले

महाबळेश्वर: सलग सुट्यांमुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून, नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत आहे. पर्यटकांची सायंकाळी नौकाविहारासाठी वेण्णालेकसह विविध प्रेक्षणीय स्थळांवर गर्दी होत आहे. मुख्य बाजारपेठेतही पर्यटक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत; परंतु अपुऱ्या वाहनतळामुळे बाजारपेठ परिसरातही मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या कोंडीमुळे पर्यटकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

उन्हाळी हंगामामुळे महाबळेश्वर व पाचगणी ही पर्यटनस्थळे बहरली आहेत. गेली काही दिवस महाबळेश्वर व परिसर धुक्यात हरवल्याचे चित्र दिसत होते. या बदललेल्या वातावरणामुळे पर्यटकांना पावसाळ्यातील महाबळेश्वरची अनुभूती मिळत आहे. शनिवार, रविवार या सलग आलेल्या सुट्यांमुळे पर्यटकांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. ऑर्थरसीट पॉइंटसह पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले श्री क्षेत्र महाबळेश्वर, शूटिंगसाठी प्रसिद्ध असलेला केट्स पॉइंट, तसेच पश्चिम घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध लॉडविक व एलिफंट हेड सोबतच सायंकाळी मुंबई पॉइंट येथे पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. किल्ले प्रतापगड, शिवकालीन खेडेगाव, मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देत आहेत. येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला, तर चौपाटीचे स्वरूप आले असून, वेण्णालेकची पाणीपातळी घटली असली, तरी नौकाविहाराचा मनमुराद आनंद पर्यटक लुटत आहेत. अनेक हौशी पर्यटक वेण्णालेकवर घोडे सवारीचा आनंद घेत आहेत. येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरीची चव चाखताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत.येथील मुख्य बाजारपेठेत देखील पर्यटकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत असून, चणा, चिक्की, जॅम, फज सोबतच चप्पलची खरेदी करताना पर्यटक दिसत आहेत. रेस्टॉरंटही सायंकाळी फुल्ल होत आहेत.

दरम्यान, पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, तासन्तास अडकून पडावे लागत आहे. पोलिस प्रशासनाचा नियोजनशून्य कारभाराचा मनस्ताप पर्यटकांसह सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे.

Web Title: Mahabaleshwar Tourists Vennalake Boating

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top