जिल्हाधिकारी साहेब! उद्याची बैठक आमच्या येथेच घ्या, व्यावसायिकांची मागणी

अभिजीत खूरासणे
Wednesday, 3 February 2021

या बैठकीला नागरीकांनीही मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महाबळेश्वर (जि. सातारा) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackreay) यांनी दिलेल्या आदेशा नुसार जिल्हा प्रशासनाने महाबळेश्वर (Mahableshwar) बाजारपेठ सुशोभिकरणाचा आराखडा तयार केला आहे. या आरखडयाची माहिती नागरीकांना देणे व त्या संदर्भात नागरीकांच्या सुचना व हरकतींचा विचार करणे या साठी सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वर येथील नागरीकांची महत्वपुर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या (ता.४, बुधवार) दुपारी दाेन वाजता आयोजित करण्यात आली आहे.  बाजारपेठे विकासासंदर्भात असलेली ही बैठक महाबळेश्वर ऐवजी सातारा येथे होत असल्याने शहरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणुन व थंड हवेचे ठिकाण म्हणुन प्रसिध्द आहे. देश भरातुन दरवर्षी येथे साधारण 20 लाख पर्यटक भेट देवुन निसर्ग सौदर्याचा आनंद लुटत असतात. असे असले तरी उत्तर व दक्षिण भारतात महबळेश्वर या पर्यटन स्थळाची माहीती पोहोचली नाही. महाबळेश्वरला मोठया प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाबळेश्वर शहराचा परदेशातील पर्यटन स्थळाच्या धर्तीवर विकास व सुशोभिकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी 100 कोटींचा निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. 

सकाळची डिजिटल भरारी, क्विन्टटाईप टेक्नॉलॉजि इंडियासोबत केला महत्त्वाचा करार 

प्रामुख्याने बाजारपेठ सुशोभिकरणासह वेण्णालेकचे काम तातडीने हाती घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशा नुसार बाजारपेठ सुशोभिकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून या आराखडयास वारसा स्थळ जतन समितीचा हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे.

बाजारपेठ सुशोभिकरणाची माहीती येथील नागरीकांना देणे व त्या संदर्भात नागरीकांच्या सुचना ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत बाजारपेठेतील मिळकत धारकांची महत्वपुर्ण बैठक उद्या (बुधवार) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी यांच्या सह प्रांताधिकारी संगिता राजापुरकर, तहसिलदार सुषमा चौधरी पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पोलिस निरिक्षक बी.ए.कोंडुभैरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान महाबळेश्वर बाजारपेठ सुशोभीकरणाची बैठक महाबळेश्वर येथे होणे अपेक्षित होते. मात्र असे न होता या बैठकीचे आयोजन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात होत असल्याने शहरातून आश्चर्य व्यक्त होत आहे. ही बैठक महाबळेश्वरमध्ये घेण्यात यावी अशी मागणी स्थानिक करीत आहेत. याबराेबरच येथील व्यापा-यांनी देखील ना न सांगण्याच्या अटीवर प्रशासनाने केलेले नियाेजन याेग्य नसून प्रत्येकाला साता-याला जाणे शक्य नसल्याचे नमूद केले.

पश्‍चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना मिळणार चालना; आरोग्यमंत्र्यांनंतर उदयनराजेंची रेल्वेमंत्र्यांना भेट, गोयलांकडे केल्या या महत्वपूर्ण मागण्या

तुला कापू का ? कोंबडी म्हणते नको नको : हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

संपादन - सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahableshwar Businessman Demands Shekhar Singh Meeting To Be Held in Mahableshwar Satara Breaking News