महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे घुमजाव ;अभ्यासक्रमात मोठा बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Gazetted Technical Services Examination Syllabus MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे घुमजाव ;अभ्यासक्रमात मोठा बदल

कोरेगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमात कोणताही बदल केला जाणार नाही, असे घोषित केले. मात्र, आयोगाने अचानक अभ्यासक्रमात मोठा बदल करून परीक्षेसाठी जाहिरातही काढली. परिणामी, मागील चार वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. आयोगाने आता वयाची मर्यादा टाकल्यामुळे कदाचित हे विद्यार्थी प्रशासकीय सेवेलाही मुकण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षेबाबत १६ जून २०२१ रोजी महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा व महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा या संवर्गासाठी ‘मुख्य परीक्षेच्या परीक्षा योजना आणि अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही’ असे घोषित केले. मात्र, अचानक ११ फेब्रुवारीला महाराष्ट्र कृषी सेवाचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर केला. आयोगाने तातडीने काल (ता. १८) परीक्षेसाठी जाहिरातदेखील काढली असून, त्यात पूर्व परीक्षा ३० एप्रिलला, तर मुख्य परीक्षा एक नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे.

आयोगाने अचानक अभ्यासक्रम बदलल्यामुळे आणि परीक्षा तारखाही तातडीने जाहीर केल्यामुळे मागील चार वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. नवीन अभ्यासक्रमात बीएस्सी (कृषी) शाखेचा ६२ टक्के (४०० पैकी २४८ गुण), तर इतर शाखांचा ३८ टक्के (४०० पैकी १५२ गुण), अभ्यासक्रम (कृषी अभियांत्रिकी, उद्यानविद्या, अन्नतंत्रद्यान प्रत्येकी चार टक्के, जैवतंत्रत्रज्ञान २.५ टक्के, कृषी व्यवसाय व्यवस्थापन १.५ टक्के व मत्स्य विज्ञान, सामाजिक विज्ञान प्रत्येकी १ टक्का) आहे. त्यात बीएस्सी (कृषी) शाखेला झुकते माप, तर इतर शाखांवर अन्याय केल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर मागील चार वर्षांमध्ये पदवी मिळालेले आणि परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थांची आपल्या पदवीच्या अभ्यासक्रमावर प्रश्न येणार नसल्यामुळे आपल्या पदवीला दोष द्यायचा, की अभ्यासक्रमाला अशी द्विधा मनःस्थिती झाली आहे.

मूळ मुद्दा, अभ्यासक्रम तयार करताना महाराष्ट्रातील कृषी विभागातील दोन महत्त्वाच्या पदव्यांपैकी (कृषी आणि कृषी अभियांत्रिकी) फक्त कृषी या पदवीचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करून वैकल्पिक पेपर दोन (कृषी अभियांत्रिकी) देणे आवश्यक आहे. त्या पेपरमध्ये ‘कृषी’चा १६ गुणांचा अभ्यासक्रम टाकावा व कृषी अभियांत्रिकीचा जास्तीचा समावेश असावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

विद्यार्थ्यांसह संघटना आक्रमक

कोणतीही पूर्वसूचना न देता आयोगाला अभ्यासक्रम बदलावा लागला, नेमके कोणाच्या सांगण्यावरून अभ्यासक्रमात बदल करण्यात आला, त्यासाठी कोणती तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली, यासाठी गुणांची विभागणी करताना कोणते शास्त्रीय कारण परिमाण मानले आहे, याचा उलगडा लोकसेवा आयोगामार्फत व्हावा, अशी मागणी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून होऊ लागली आहे.

पांडुरंग बर्गे

Web Title: Maharashtra Gazetted Technical Services Examination Syllabus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top