पावसाने हिरावला डोळ्यांदेखत हातातोंडाशी आलेला घास; इंद्रायणी, बासमतीचे उत्पादन घटणार

जयंत पाटील
Saturday, 31 October 2020

इंद्रायणी, बासमती जातीच्या तांदळला चव चांगली असल्याने पुणे, मुंबई, गुजरात, सातारा, कऱ्हाड, अलिबाग आदी शहारांत येथील तांदळाची जागेवरून मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. काही हॉटेल व्यावसायिक याच तांदळाचा वापर करतात. भाताचे उत्पादन घटणार असल्याने तांदळाचे भाव वाढण्याची शक्‍यता आहे.

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : उसानंतर कोपर्डे हवेली परिसरात भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हा परिसर इंद्रायणी, बासमती तांदळाचे आगर म्हणून ओळखले जाते; परंतु यंदा 
भात काढणीला आलेला असतानाच सततच्या वादळी पावसाने भाताचे नुकसान झाल्याने भाताचे उत्पादन घटणार आहे. 

इंद्रायणी, बासमती जातीच्या तांदळाला चांगली बाजारपेठ असल्याने अनेक शेतकरी भाताचे उत्पादन घेताना उत्पादन खर्च जास्त करतात. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी भाताचे पीक जोमदार आणले होते; परंतु गेल्या महिनाभरापासून अवकाळी वादळी पावसामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचा काढणीस आलेला भात वादळी पावसामुळे वाहत्या पाण्यात भुईसपाट झाला आहे. अशा परिस्थितीत भाताच्या लोंब्या कुजत आहेत, तर गेल्या 15 दिवसांपूर्वी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेकांचे पीक जळून गेले आहे. 

कोल्हापूर, अहमदाबाद, बंगळूर सिटी एक्‍स्प्रेस गाड्यांना साताऱ्यात 'थांबा' आवश्यक : खासदार पाटील

सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात भात पिकात पाणी वाहत आहे. शिल्लक असलेल्या भात पिकाची काढणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे. भात पिकाच्या काढणीचे दिवस संपत चालले आहेत आणि पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याची अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. दरम्यान, येथील भाताच्या तांदळला चव चांगली असल्याने पुणे, मुंबई, गुजरात, सातारा, कऱ्हाड, अलिबाग आदी शहारांत येथील तांदळाची जागेवरून मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. काही हॉटेल व्यावसायिक याच तांदळाचा वापर करतात. भाताचे उत्पादन घटणार असल्याने तांदळाचे भाव वाढण्याची शक्‍यता आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर मलकापूर हद्दीत अपघात; कालेटेकची महिला जागीच ठार 

दर वर्षीप्रमाणे यंदाही दोन एकर भात लागण केली होती. उत्पादन चांगले मिळावे, यासाठी मोठा खर्च केला. आधी सगळीकडे तांबडे तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव होता. त्यावर फवारणी करून त्यापासून भात वाचवला; परंतु या वादळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत हिरावला. 
-संभाजी चव्हाण, शेतकरी, कोपर्डे हवेली 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major Damage To Rice Crop Due To Rains At Koparde Haveli Satara News