
सातारा : महामार्गाचा वेग वन्यजीवांसाठी जीवघेणा
कलेढोण : मायणी पक्षी संवर्धन राखीवमधून जाणाऱ्या मल्हारपेठ- पंढरपूर राज्यमार्गावर वन्यजीवांच्या अपघातात वाढ झाली आहे. या अपघातात वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गेल्या महिनाभरात उदमांजर, कोल्हा, होला, सरडे प्राणी महामार्गावर मृत्युमुखी पडले आहेत. त्यासाठी गतिरोधक, गतिरोधक पांढरे पट्टे व मार्गदर्शक फलकांची उभारणी गरजेची आहे. वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने वन्यजीवांच्या मृत्यूबाबत गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
मायणी पक्षी संवर्धनात पक्ष्यांचा अधिवास अधोरेखित झाल्याने १५ मार्च २०२१ मध्ये शासनाने मायणीस पक्षी संवर्धनाचा दर्जा दिला. या संवर्धनातील सुमारे ६५ हेक्टर क्षेत्रातील वनविभागात वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे, विविध जैवविविधता आढळून येते. त्यामुळे येथे पर्यटकांचाही ओढा वाढला आहे. याच वनक्षेत्रात तरस, कोल्हा, लांडगा, उदमांजर, रानमांजर यांचा अधिवास आहे. पाणथळीच्या जागेत विविध पक्ष्यांचाही अधिवास आहे. येथील वनक्षेत्रात विविध पक्ष्यांचे प्रजननही होते. हे पक्षी व प्राणी अन्नाच्या शोधात भटकंती करतात.
ही भटकंती करताना त्यांचा प्रवास वनविभागातून जाणाऱ्या मल्हारपेठ- पंढरपूर मार्गावरून होतो. निशाचर प्राणी अन्नाच्या शोधात वनक्षेत्रातील महामार्गावरून ये-जा करत असतात, तर पक्षी पाण्याच्या शोधात तलावाकडे जातात. यादरम्यान महामार्गावरील भरधाव जाणाऱ्या वाहनांमुळे प्राण्यांना व पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे.
गेल्या महिनाभरात या मार्गावर उदमांजर, कोल्हा, होला, सरडे, फुलपाखरांचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी वनविभागाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मागणी करत महामार्गावर गतिरोधक, पांढरे पट्टे मारण्याची गरज आहे. वनविभागाने मार्गदर्शक सूचना फलकांची उभारण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे वाहनचालकांना येथील वनजीवांची माहिती होऊन वाहनांचा वेग कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.
दरम्यान, याबाबत मायणीचे वनक्षेत्रपाल महादेव पाटील म्हणाले, ‘‘महामार्गावरील वाहनांच्या भरधाव वेगामुळे वन्यप्राण्यांच्या मृत्यूबाबत वडूजच्या बांधकाम विभागाला पत्राद्वारे कळविले आहे. वनविभागाने त्यांच्याकडे गतिरोधकाची मागणी केली आहे.’’
Web Title: Malharpeth Pandharpur Highways Number Of Increasing Wild Animal Accident
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..