मलकापूरवासियांनी दहा वर्षांत पहिल्यांदाच भरले टॅंकरने पाणी

राजेंद्र ननावरे
Wednesday, 9 September 2020

ओगलेवाडी येथे ट्रान्स्फॉर्मर दुरुस्तीसाठी नेण्यात आला. दुरुस्त करून रात्री बाराच्या सुमारास आणल्यानंतर जोडणी करण्यात आली.

मलकापूर (जि. सातारा) : वादळी वाऱ्याने काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने शहरात वीज व पाणीपुरवठा खंडित झाला होता. 40 तासांनतर वीजपुरवठा सुरळीत झाला. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. दरम्यान नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेच्या वतीने काही भागांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

रविवारी रात्री दहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहर व परिसरात पाऊस झाला. त्यामध्ये वीजवाहक तारांवर झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब पडले, काही घरांचे पत्रे उडून गेले, तर कुंपणाच्या भिंती ढासळून नुकसान झाले. काल रात्रीपासून परिसरातील वीज व पाणीपुरवठा बंद होता. दोन्ही विभागांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. मात्र, झाडे बाजूला करण्यात वेळ गेला. मंगळवारी दुपारी एक वाजता संपूर्ण काम पूर्ण होऊन वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला.

भारीच! उंडाळे पंचायत रुग्णांना देणार मोफत ऑक्‍सिजन 

रविवारी (ता. 6) रात्री विद्युतपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणीपुरवठाही खंडित झाला. सोमवारी जॅकवेल व जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात विद्युतपुरवठा सुरू झाला. मात्र रात्री उशिरा ट्रान्स्फॉर्मर जळाल्याचे लक्षात आल्यानंतर तो ट्रान्स्फॉर्मर ओगलेवाडी येथे दुरुस्तीसाठी नेण्यात आला. दुरुस्त करून रात्री बाराच्या सुमारास आणल्यानंतर जोडणी करण्यात आली. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शहरात दहा वर्षांत पहिल्यांदाच काही भागांत पालिकेकडून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला.

रेशन दुकानदारांकडून गरिबांची पिळवणूक; पुरवठा विभागाचे प्रचंड दुर्लक्ष
 
या कामासाठी उपाध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, शहाजी पाटील, हणमंत शिंगण, पाणीपुरवठा अभियंता आत्माराम मोहिते, महावितरण शाखा अभियंता यु. आर. धर्मे यांच्यासह महावितरण व पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

घेवडा भिजला आता ऊसही भुईसपाट झाला; कोरेगावातील शेतकरी व्यथित 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malkapur Muncipal Council Water Cut Off Satara News