मलकापूरची अतिक्रमण हटाव मोहीम ठरली फार्स

राजेंद्र ननावरे
Thursday, 29 October 2020

व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करून पालिकेने नेमके काय साध्य केले? दिवाळी तोंडावर असताना कारवाई योग्य होती का, कारवाईचा गाजावाजा केल्यानंतर शहरात वातावरण दूषित झाले आहे. त्याला जबाबदार कोण, असे एक ना अनेक प्रश्न व्यावसायिक व नागरिकांमधून व्यक्‍त होत आहेत.

मलकापूर (जि. सातारा) : येथील महामार्गालगतची 300 हून अधिक अतिक्रमणे हटविण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त सोबत घेत गाजावाजा करत पालिकेने मोहीम हाती घेतली. मात्र, प्रत्यक्षात त्याचा फज्जा उडाला. केवळ चार अतिक्रमणे हटली. त्यामुळे पालिकेने व्यावसायिकांच्या आक्रमतेविरोधात नांगी टाकल्याचे स्पष्ट झाले. अतिक्रमण हटावचा फार्स सत्ताधाऱ्यांनाही विचार करायला लावणारा आहे.

पालिकेने 292 जणांना नोटिसा देऊन 48 तासांची मुदत दिलेली होती. मुदत संपल्यानंतर अतिक्रमणांवर हातोडा पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ चार अतिक्रमणे हटविण्यात आली. दोन व्यावसायिकांना टॅक्‍स भरण्याच्या सूचना दिल्या. त्या व्यतिरिक्त काहीच केले नाही. मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणांचा बार फुसका निघाला. अतिक्रमणे काढणाऱ्या पथकाने अतिक्रमणधारकांना केवळ सूचना देऊन मुदतवाढ दिली. व्यावसायिकांच्या आक्रमकतेपुढे प्रशासनाने नांगी टाकल्याचे स्पष्ट झाले. कोरोना, अतिवृष्टीने कणा मोडलेले व्यावसायिक आता कोठे सावरत असतानाच त्यांच्या हातात अतिक्रमण हटावच्या नोटिसा पडल्या. जे मिळकतदार अतिक्रमण काढणार नाहीत, त्यांच्यावर अतिक्रमण हटावचा हातोडा पडणार होता.

पालकमंत्र्यांसह सर्वच झारीतील शुक्राचाऱ्यांनी अगोदर निवडणूक लढवावी : जयकुमार गाेरेंचा 'राष्ट्रवादी'ला टाेला

पालिकेने मोहीम हाती घेतली खरी मात्र चार अतिक्रमणे काढली. तर उर्वरित 288 जणांना म्हणणे मांडण्याची मुदतवाढ देण्यात आली. मिळकतदारांचे म्हणणे नगरविकास विभागाकडे सादर करून संबंधित विभाग जो आदेश देईल, त्याप्रमाणे पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले. नोटिसा देऊन घाई का केली, मुदत वाढवूनच द्यायची होती तर अतिक्रमण हटावचा गाजावाजा का केला, अशा सामान्यांच्या प्रश्नांना पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे अतिक्रमण हटावचा फार्स सत्ताधाऱ्यांनाही आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. 

तोंडे बघून मलकापूरात अतिक्रमणची कारवाई कशासाठी? अशोकराव थोरात

एक ना अनेक प्रश्न... 

व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करून पालिकेने नेमके काय साध्य केले? दिवाळी तोंडावर असताना कारवाई योग्य होती का, कारवाईचा गाजावाजा केल्यानंतर शहरात वातावरण दूषित झाले आहे. त्याला जबाबदार कोण, असे एक ना अनेक प्रश्न व्यावसायिक व नागरिकांमधून व्यक्‍त होत आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malkapur Municipal Council Encroachment Stopped Within Few Hours Satara News