ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शेखर गोरे, प्रभाकर देशमुख यांची भूमिका ठरणार निर्णायक

विशाल गुंजवटे | Monday, 14 December 2020

ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवल्या जात असल्या तरी त्यात पक्षीय रंग दिसून येतातच. आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या कारकिर्दीत मतदारसंघात चांगली ताकद वाढवली आहे. त्यामुळे त्यांनी विजयाची "हॅट्रिक' साधली.

बिजवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून त्यानंतर सहकार क्षेत्रातील निवडणुकाही होत आहेत. या सर्व निवडणुकांत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्रसुभा उभा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निवडणुका एकत्र लढवण्यासाठी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस-राष्ट्रवादीची काही अडचण वाटत नाही. परंतु, माण तालुक्‍यातील शिवसेना या आघाडीत सामील होणार का? कारण शिवसेनेचे नेते शेखर गोरे व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्यातला राजकीय दुरावा सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे हे दोघेजण पक्षादेश मानून एकत्र काम करणार की वेगळा कोणता निर्णय घेणार, हे पाहावे लागणार आहे. 

राज्यात भारतीय जनता पक्ष हाच आपला प्रमुख शत्रू असून, त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेना या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करून त्याद्वारे पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निमित्ताने एकत्र निवडणूक लढवत महाविकास आघाडीचा "फॉर्म्यु'ला यशस्वी करून दाखवला. या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या पक्षांनी प्रामाणिकपणे काम केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. तर या निवडणुकीत भाजप एकाकी पडल्याचे दिसून आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राज्यात महाविकास आघाडीला चांगले दिवस आले असून, त्याचा प्रत्यय नुकताच पदवीधर निवडणुकीत दिसून आला. आता ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून, या निवडणुकांत महाविकास आघाडी पदवीधर निवडणूकप्रमाणे एकत्र लढेल, असे ठामपणे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, हाच "फॉर्म्यु'ला माण तालुक्‍यात आगामी निवडणुकांत दिसणार की महाविकास आघाडीत बिघाडी होणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे उद्या राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण 

Advertising
Advertising

माण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकी होती, तर विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना विरोध करत सर्वपक्षीय नेतेमंडळींनी पक्षाला बगल देत आपला अपक्ष उमेदवार उभा केला होता. अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचे नेते व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी निवडणूक लढवली. भाजपकडून आमदार जयकुमार गोरे यांनी तर शिवसेनेकडून शेखर गोरे यांनी निवडणूक लढवली होती. यात भाजपने बाजी मारत आमदार जयकुमार गोरे यांनी विजयाची "हॅट्रिक' साधली. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे. माण मतदारसंघातही भाजपची सत्ता आहे. त्यांना विरोध करण्यासाठी राज्याचा फॉर्म्युला माण मतदारसंघात राबवला जाणार का? या मतदारसंघात कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी आहे. पण, यात शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. कारण त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष व राष्ट्रवादी पक्षात असताना आपल्या नेतृत्वाखाली सोसायट्या, ग्रामपंचायती, पंचायत समितीच्या निवडणुकांत उज्वल यश मिळवले होते. नंतरच्या काळात सेवानिवृत्त झाल्याने प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीच्या गोटात सक्रियपणे सामील झाले. मात्र, पक्षात त्यांचे व शेखर गोरेंचे सूत शेवटपर्यंत कधीच जुळले नाही. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रपणे येत असताना राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख व शिवसेनेचे शेखर गोरे एकमेकांना विरोध करत आघाडीत बिघाडी करणार की, पक्षादेश मानत एकत्रपणे काम करणार, हे पाहावे लागणार आहे. 

जिल्ह्यात सद्य:स्थितीत लॉकडाउनचा कोणताही विचार नाही : शेखर सिंह

ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्थानिक पातळीवर लढवल्या जात असल्या तरी त्यात पक्षीय रंग दिसून येतातच. आमदार गोरे यांनी आपल्या कारकिर्दीत मतदारसंघात चांगली ताकद वाढवली आहे. त्यामुळे त्यांनी विजयाची "हॅट्रिक' साधली. सर्वजण स्वतंत्रपणे लढले तर आमदार गोरे कोणाला ऐकतील, असे वाटत नाही. मात्र, सर्वजण एकत्र आले तर आमदार गोरे पदवीधरच्या निवडणुकीप्रमाणे एकाकी पडण्याची शक्‍यता आहे. महाविकास आघाडी झाली तर गावागावांत ही अशीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निवडणुका एकतर्फी होतील असे दिसून येते. मात्र, यात बंडखोरीचीही शक्‍यता नाकारता येणार नाही. याचा फायदा आमदार गटाला होऊ शकतो. दरम्यान, शरीराने भाजपमध्ये तर मनाने महाविकास आघाडीबरोबर असलेले जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल देसाई या निवडणुकांत कोणती भूमिका घेणार, की आपला सवतासुभा उभा करणार, हेही पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

""राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारने समन्वय साधत चांगला कारभार चालवला आहे. आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार असून, माण तालुक्‍यातही कॉंग्रेस महाविकास आघाडीच्या बरोबरच असेल.'' 

- एम. के. भोसले, अध्यक्ष, माण तालुका कॉंग्रेस 

पंचायत समितीच्या सदस्यांना मिळणार दहा लाखांचा विकासनिधी

""माण तालुक्‍यात आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाणार असून, या ग्रामपंचायत निवडणुकांत राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष सर्वांना बरोबर घेऊन निवडणूक लढवणार आहे.'' 

-बाळासाहेब सावंत, अध्यक्ष, माण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस 

सातारा नियोजन समितीला शंभर टक्के निधी; कोरोनात थांबविलेली कामे लागणार मार्गी

""ग्रामपंचायत ही गावकी व भावकीची निवडणूक असली तरी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवण्याच्या विचारात आहोत.'' 

-बाळासाहेब मुलाणी, अध्यक्ष, माण तालुका शिवसेना

माणदेशी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया देतेय उद्योजिकांना कर्ज वाटपातून बळ

Edited By : Siddharth Latkar