
Bhumi Abhilekh : घर बसल्या पाहा जमिनींचे नकाशे
सातारा : भूमिअभिलेख विभागाने सर्व्हे नंबरनिहाय गाव नकाशे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेमुळे संबंधित गावात जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतुःसीमा, आजूबाजूचे गटनंबर आणि मालक कोण आहेत, याची माहिती आता घरबसल्या एका क्लिकवर मिळत आहे.
यासह इस्रोच्या मदतीने सॅटेलाईट इमेज घेऊन जिओरेफरन्स मॅपच्या आधारे गाव नकाशा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेमुळे प्रत्यक्ष जमीन कुठे आहे, त्याची भौगोलिक परिस्थितीची माहिती नागरिकांना मिळणे शक्य होईल.
भूमिअभिलेख विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ऑनलाइन सातबारा उतारा, आठ ‘अ’, फेरफार आदी सुविधांबरोबरच सर्व्हे नंबरनिहाय गावाचा नकाशा महाभूमी या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारा आणि गाव नकाशा एकमेकांशी लिंक केला आहे. त्यामुळे जमिनीची खरेदी आणि दस्तनोंदणी करण्यापूर्वी ही सर्व माहिती नागरिकांना एका क्लिकवर मिळत आहे. सातबारा उतारा गाव नकाशाशी लिंक केल्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील अथवा गावातील जमिनींची अक्षांश-रेखांशसह (जीपीएस) सर्व माहिती सहजरीत्या उपलब्ध होत आहे.
असा शोधा नकाशा...
सर्व्हे नंबरनुसार गाव नकाशा mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
महाभूनकाशा हा पर्याय निवडावा
अनुक्रमे जिल्हा, तालुका, गाव निवडा
गाव नकाशा पर्याय निवडल्यानंतर गाव नकाशा मिळेल
संबंधित सर्व्हे नंबर टाकल्यावर त्या क्षेत्राचा नकाशा पीडीएफमध्ये
नकाशाची प्रिंटही काढता येईल.
जर तुम्हाला जिओरेफरन्स मॅप पाहायचा असल्यास नकाशाच्या उजव्या बाजूला जिओरेफरन्स मॅपवर क्लिक करा, त्यानंतर सॅटेलाईट इमेज उपलब्ध होईल.
सर्व्हे नंबरनुसार गाव नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे जमिनीचे स्थान निश्चितीसाठी ही माहिती उपयुक्त ठरत आहे. त्याचबरोबर संबंधित सर्व्हे नंबरवर मालकी कोणाची आहे, याची माहितीही मिळत आहे. भूमी अभिलेख विभागाने गाव नकाशे पीडीएफमध्ये उपलब्ध केल्यामुळे त्यांची निःशुल्क प्रिंट काढता येते.
- सरिता नरके, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा ई-फेरफार प्रकल्प समन्वयक, भूमिअभिलेख विभाग