मराठा समाजाचे उद्या सहकारमंत्र्यांच्या निवासस्थाना समाेर ठिय्या आंदोलन

सुहास शिंदे | Monday, 28 September 2020

सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाने 29 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता कऱ्हाड येथील टॉउन हॉलजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

पुसेसावळी (जि. सातारा) : मराठा आरक्षणावर राज्यात ठिकठिकाणी निदर्शने होत असताना मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी (ता. 29) कऱ्हाडमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. याबाबत मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
 
मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय प्रवर्गातून सरकारी नोकरी, शिक्षण व इतर बाबींमध्ये दिले गेलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झाला असून आपल्या हक्कांसाठी राज्यभर ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, आंदोलनांच्या माध्यमातून मराठा समाज आपला क्रोध व्यक्त करत आहे.

अशा पद्धतीने ओळखा ताज्या आणि शिळ्या माशांमधला फरक

सातारा जिल्ह्यातूनही मराठा समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या हतबल असलेल्या मुलांना व गरजू तरुणांना न्याय मिळावा, यासाठी सातारा जिल्ह्यानेही तयारी केली आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोचवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी (ता. 29) कऱ्हाडातील यशवंतराव चव्हाण टॉउन हॉल ते पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

Advertising
Advertising

शेतकऱ्यांच्या समस्यांचा आता बांधावरच फैसला; कृषिमंत्री दादा भुसेंचे फर्मान

त्यामध्ये टॉउन हॉल ते सहकारमंत्र्यांचे निवासस्थान या मार्गाने मोर्चा जाईल. सहकारमंत्र्यांकडून निवेदन स्वीकारले जात नाही व मराठा समाजाला ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. आपल्या हक्काच्या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी सातारा जिल्ह्यातील मराठा समाजाने 29 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता कऱ्हाड येथील टॉउन हॉलजवळ उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या मोर्चाचे प्रतिनिधित्व जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाज करणार आहे.

कऱ्हाड आरटीओ कार्यालयात ई-चलन प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई 
 

मोर्चादरम्यान सर्वांनी शिस्तीचे व नियमांचे पालन करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी व आपल्या मागण्या सरकारपर्यंत योग्यरितीने पोचवाव्यात. 

- सुहास पिसाळ, मोर्चा नियोजनकर्ते, चोराडे

Edited By : Siddharth Latkar