तत्काळ निर्णय घ्या, अन्यथा कामे बंद ठेवू ; माथाडी नेते नरेंद्र पाटलांचा इशारा

राजेश पाटील
Monday, 27 July 2020

काेराेनाच्या कालावधीत नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजार आवारातून नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी माथाडी कामगार जीव धोक्‍यात घालून कार्यरत राहिले होते.

ढेबेवाडी (जि.सातारा) : सुरक्षारक्षक, माथाडी कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करून त्यांना केंद्र व राज्य शासनामार्फत विमाकवच, सानुग्रह अनुदान आणि रेल्वे प्रवासासाठीचा ई-पास देण्याबाबत तत्काळ निर्णय घ्या, अन्यथा कामे बंद ठेवू, असा इशारा माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
"या" तिर्थक्षेत्री भाविकांना प्रवेशबंदी 

याबाबत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने दिलेल्या पत्रकातील माहितीनुसार, विविध मागण्यांकडे धरणे आंदोलनाव्दारे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. माथाडी कामगार नेते पाटील यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वे, हार्बर लाईनवरील वाशी (मुंबई) रेल्वे स्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. संघटनेचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, पोपटराव देशमुख, रविकांत पाटील आदी पदाधिकारी त्यामध्ये सहभागी झाले होते. स्थानक प्रबंधक ए. एन. सिंग यांना संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

तुम्हीच सांगा... कसे करायचे ह्यांचे संगोपन  

नरेंद्र पाटील म्हणाले,""कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने 22 मार्चपासून लॉकडाउन जाहीर केलेला होता. या कालावधीत नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजार आवारातून नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी माथाडी कामगार जीव धोक्‍यात घालून कार्यरत राहिले होते. कोरोनाच्या संकटात नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा व्हावा, म्हणून जीव मुठीत घेऊन काम करणाऱ्या माथाडी, सुरक्षा रक्षक कामगार व अन्य घटकांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करावा, त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून विमा कवच, सानुग्रह अनुदान तसेच रेल्वेने प्रवास करण्यासाठी क्‍यूआर कोड ई-पास मिळावा, या घटकांचे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी कामाच्या ठिकाणी आवश्‍यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.''

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mathadi Leader Narendra Patil Demands E Pass For Mathadi Kamgar