ओबीसींच्या आरक्षणाला जाणीवपूर्वक नख लावण्याचा प्रयत्न, ओबीसी संघटनेचा आरोप

ओबीसींच्या आरक्षणाला जाणीवपूर्वक नख लावण्याचा प्रयत्न, ओबीसी संघटनेचा आरोप

पाटण (जि. सातारा) : देशभरात आणि राज्यात जवळपास 60 टक्के असलेल्या ओबीसी समाजाचे अस्तित्व आणि आरक्षण धोक्‍यात आणण्याचा कुटील डाव उधळून लावणे ही काळाची गरज असून, हा धोका ओळखून ओबीसी समाजबांधवांनी जागरूकपणे समाज संघटित करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष भरत लोकरे यांनी केले. 

येथील संत गोरोबाकाका मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या तालुका ओबीसी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी सुभाष कुंभार, राजेंद्र राऊत, नामदेव कुंभार, राजेश कुंभार, संजय कुंभार, वसंत लोहार, शंकर सुतार, आनंदा सुतार, बाळकृष्ण राऊत, बाळासाहेब पवार आदींसह ओबीसी समाजबांधव उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष श्री. लोकरे म्हणाले, "सद्यःस्थितीत ओबीसी समाजाच्या अस्तित्वासाठी निकराचा संघर्ष उभा करावा लागणार आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या आणि जवळपास 350 जातीत विखुरलेल्या 52 टक्के ओबीसींची 27 टक्के आरक्षणावर बोळवण करण्यात आली; पण त्यासाठीही स्वातंत्र्यानंतर चाळीस वर्षांहून अधिक काळ हाल सोसावे लागले असून, मंडल आयोगाने काही अंशी मिळालेल्या ओबीसींच्या याच हक्काच्या आरक्षणाला जाणीवपूर्वक नख लावले जात आहे.

स्वातंत्र्योत्तर 70 वर्षांचा काळ लोटला तरी ओबीसींची स्वतंत्र जनगणना होत नाही. आता ओबीसी म्हणून स्वतंत्रपणेच जनगणना झाली पाहिजे, अन्यथा आपल्या अस्तित्वासाठी जनगणनेवरच बहिष्कार टाकावा लागणार आहे. ओबीसी समाजामधील दैन्यावस्था दूर करण्यासाठी, तसेच आपल्या अस्तित्वासाठी आणि भावी पिढीच्या भवितव्यासाठी आता रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागणार आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आणि आरक्षणाच्या हक्कासाठी ओबीसी समाजाने संघटितपणे सामोरे जाण्याची गरज आहे.'' सुभाष कुंभार यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. वसंत लोहार यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com