esakal | ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारा I Shetkari Sanghatana
sakal

बोलून बातमी शोधा

Shetkari Sanghatana

शेतकऱ्यांनी थकीत ऊसबिल व ऊसदराचे तुकडे या विरोधात एकजूट करून लढले पाहिजे.

ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारा

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

अंगापूर (सातारा) : ऊसबिलाचे (Sugarcane Bill) तुकडे पाडू दिले जाणार नाहीत, तसेच वीज वितरणाची बोगस बिले अदा केली जाणार नाहीत, असा इशारा शेतकरी संघटनेचे (Shetkari Sanghatana) जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला. अंगापूर वंदन येथे संघटनेचे संघटक मनोहर येवले यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात (Farmer Meeting Angapur Vandan) ते बोलत होते. या वेळी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजू केंजळे, कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, दत्तात्रय पाटील, संजय जाधव, रमेश पिसाळ आदी उपस्थित होते.

श्री. शेळके म्हणाले, ‘‘सातारा येथे ऊसदराचे (एफआरपी) तुकडे व महावितरणची बोगस बिले या विरोधामध्ये शेतकऱ्यांची एकजूट होत असून, संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर याबाबत गावोगावी शेतकरी मेळावे घेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याला गावोगावी वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. ऊसदराचे तुकडे पाडणाऱ्या कारखान्याचे धुरांडे यावर्षी पेटू देणार नाही. शेतकऱ्यांनी थकीत ऊसबिल व ऊसदराचे तुकडे या विरोधात एकजूट करून लढले पाहिजे. आजपर्यंत फक्त शेजारच्या जिल्ह्यातील शेतकरी उसाच्या रास्त दरासाठी भांडत आहेत आणि आपला जिल्हा क्रांतिकारकांचा असूनदेखील गप्प बसून मिळेल तो व मिळेल तसा दर घेऊन लाचारपणे जगत आहे. आता याविरुद्ध आपणच लढा दिला पाहिजे.’’

हेही वाचा: भाजपच्या राजेंविरोधात राष्ट्रवादी मैदानात

शासनाने नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार सानुग्रह अनुदान दिले नाही, तसेच महावितरण खोटी बिले छापून शेतीपंपाच्या वसुलीसाठी बिघाड करून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. एवढे असूनसुद्धा एकही लोकप्रतिनिधी यावर अवाक्षर काढत नाही, असा आरोपही शेळके यांनी केला. त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वत: लढण्यास तयार राहा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. मेळाव्यास राजेंद्र शेडगे, तुकाराम शेडगे, कृषिभूषण योगेश पवार, सौरभ कोकीळ, समाधान कणसे, अमोल कणसे, बजरंग कणसे, तसेच अंगापूर, वर्णे, फडतरवाडी, निगडी, कामेरी, धोंडेवाडी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पांडुरंग गवळी यांनी प्रास्ताविक केले. जयवंत जाधव यांनी आभार मानले.

loading image
go to top