esakal | 'जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे..', वाचा 'तिच्या' विषयी
sakal

बोलून बातमी शोधा

'जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे..', वाचा 'तिच्या' विषयी

अनेक मनाेरुग्णांना उपचारानंतर कदाचित त्यांचे घर, नातेवाईक मिळतील हिच अपेक्षा ठेवून समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी अहोरात्र आम्ही प्रयत्न करतोय कारण, माणुसकी अजून जिंवत आहे, असे रवी  बाेडके नमूद करतात. 

'जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे..', वाचा 'तिच्या' विषयी

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : निराधार, पोरकी मुले-मुली आणि अडचणीत सापडलेल्या स्त्रियांना आधार द्यायचा, संरक्षण द्यायचे, त्यांची काळजी घ्यायची, पोटभर अन्न, अंगभर कपडा अन्‌ घराची ऊब द्यायची, पाठीवरून मायेचा हात फिरवायचा. त्यांना माणूस म्हणून वाढवायचे हे कार्य खचितच अवघड अन्‌ आव्हानात्मक. मात्र, सातारा जिल्ह्यातील वेळे या छोट्याशा गावात यशोधन ट्रस्ट अनंत अडचणींना तोंड देत हे कार्य लीलया पेलत आहे. 'जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे..' हे गाणं तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल. यातला देव असतो, तो प्रत्यक्ष माणसातंच! माणसंच माणसांना नाकारतात आणि माणसंच माणसांना स्वीकारतात. मात्र, जे स्वीकारतात, ते नाकारणाऱ्यांसाठी साक्षात सर्वस्व बनतात. असंच काहीसं यशोधन संस्थेचे रवी बोडके यांच्याबाबतीत म्हणता येईल. गेल्या अनेक वर्षांपासून यशोधन संस्थेच्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचं काम रवी बोडके करत आहेत.
पोलिसांचे आवाहन... 101 गावांत काय ठरल! 
 
महाराष्ट्रभर कार्यरत असणारी संस्था सातारा जिल्ह्याचा केंद्रबिंदू आहे. जिल्ह्यातील वेळे येथे यशोधनचे कार्यालय असून  या संस्थेत सात ते आठ कर्मचारी काम करतात. 'यशोधन'च्या माध्यमातून आतापर्यंत 491 मनोरुग्ण व्यक्तिंना सुखरूप औषधोपचाराद्वारे घरी पोहोचवण्यात आले आहे, तर चाळीस ते पंचेचाळीस जणांवर उपचार सुरू आहेत. या संस्थेला शासनाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध होत नाही, तर देणगीदारांकडून ही संस्था अविरतपणे चालवण्याचे काम रवी हे स्वतःच करत आहेत.

आरोग्य विभागाच्या रिक्त जागांचा 'हा' महत्वपूर्ण निर्णय

नुकतीच जिल्ह्यात एक घटना घडली.. एक तरुणी वणवण भटकत होती. नाही तिची कोणी विचारपूस केली, नाही तिला कोणी 'माणुसकी'चा आधार दिला. तिला कोणी तरी विचारलं, तू कोण.. तू कोठून आलीस? तुझी ही अवस्था कशाने झाली, तुझं कुटुंब कुठं आहे आणि तू एकटीच असं वणवण.. तिचं लागलीच उत्तर आलं, मी रुपाली (वय 30). ती मराठी भाषेत बोलू लागली, त्यामुळे महाराष्ट्रीयन असल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट झालं. ती बोलू लागली.. माझं लहानपण मजेतच गेलं. आई-वडिलांची मी लाडकी. शाळेतपण खूप हुशार होते. माझ्या पुढं कोणी जावूच नये, असं मला वाटायचं. त्यासाठी मी भरपूर अभ्यासपण करायची.. मला दहावीत थोडे कमी गुण मिळाले. त्याचे मला खूपच वाईट वाटले. माझ्या जिव्हारीच लागलं. खूप विचार केला. नाही ते विचार डोक्‍यात येवू लागले. डोकं भनभनू लागले. काहीच सुचेना.. माझ्या आई- बाबांनी मला दवाखान्यात नेले. समजून सांगितलं. आता बरं वाटायला लागलं होतं. कॉलेजला जायला लागले होते; पण डोक्‍यातील विचार चक्र काही थांबत नव्हतं. विनाकारण भीती वाटायला लागली होती. रात्र-रात्र झोप लागत नव्हती. खूपच उदास उदास वाटत होतं.

व्याजवाडीच्या स्नेहलचा आयर्लंडमध्ये झेंडा, कोरोना लस संशोधनासाठी निवड 

माझ्या आईला कुणीतरी सांगितलं की भूत लागलं असेल. देवऋषीकडे घेऊन जा. आईने पण मला मांत्रिकाकडे घेऊन गेले. त्या मांत्रिकानं सागितलेलं सर्व प्रकार करून पाहिले; पण मला काही बरं वाटतच नव्हतं. मी आता घरातच राहत होते. आई-वडिलांनी खूप दवाखाने केले; पण मला काही बरं वाटलंच नाही. मला मानसिक आजार झाला होता. मला मनोविकारतज्ञ डॉक्‍टर उपचाराची गरज होती. मात्र, अशिक्षित आणि कमी शिकलेल्या आई- वडिलांना ते समजत नव्हते हे सांगताना तिच्या डाेळे पाणावले....

मी जिद्द हरलेलो नाही वाचा शैलेंद्रची संघर्षमय कहाणी...

रुपाली सारख्या अनेक तरुण मुली आणि महिलांची अशीच अवस्था आहे. मानसिक आजारावरती उपचार करावे ही संकल्पना आजही समाजात रुजत नाही. अंधश्रद्धा आणि मांत्रिक याचे पलिकडे ही जावून मानसिक आजारावरती उपचार होतात आणि उपचारातून बरे होवू शकतात, असे बऱ्याच पालकांना समजत नाही, हे मोठं दुर्दैव आहे. मांत्रिक तांत्रिकाने आजवर अनेकांचा बळी घेतला आहे. सुशिक्षित असूनही काहीजण बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. या अंधश्रद्धेपोटी काहींचे संसार उध्वस्त तर काहींचा हकनाक बळी गेला आहे असे यशाेधनचे रवी यांनी सांगितले.

काय सांगता... दहा रुपयांत मिळणार एलईडी बल्ब! 

ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी चेंबूर येथील युवती सातारा परिसरात आढळली होती. याच आठवड्यातील दुसरी घटना अंदाजे 25 वर्ष वयाची मनोरुग्न तरुणी वडूज परिसरात सापडली. आपण कोण आहोत, कुठुन आलो, आपले नातेवाईक कुठे आहेत, कशाचेही भान नाही. ती फक्त सतत हसत होती. तद्नंतर वडूजमधील युवा संकल्पचे योगेश जाधव व सहकारी यांनी त्या महिलेला मदत केली. आज ती हक्काच्या 'यशोधन निवारा केंद्रात' सुखरूप पोहचली आहे. तिच्या नातेवाईकांची यशोधनकडून शोधाशोध सुरू आहे.

Video : बाळा.. गेलेला माणूस परत येत नसतो, खंबीर बनून आईला सावर

आज अशा कितीतरी रुपाली आपलं भान हरवून वणवण भटकताना दिसत आहेत. मनोरुग्ण असणं हा त्यांचा गुन्हा आहे का?, का त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. ती ही माणसंच आहेत, का समजत नाही इथल्या समाजाला.. का अशी हीन वागणूक दिली जाते निराधारांना? असा सवाल उपस्थित होत आहे. आज तिच्या या अवस्थेचा कोणीही गैर फायदा घेऊ शकतो, अशा महिला खंर तर सुरक्षित नाहीत. अशा महिलांचा यशोधन निवारा केंद्रात आपण सुरक्षित सांभाळ करतोय. गरजेप्रमाणे उपचार मिळवून देतोय. उपचारानंतर कदाचित; तिचे घर, नातेवाईक मिळतील हिच अपेक्षा ठेवून या समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी अहोरात्र प्रयत्न करतोय.. कारण, माणुसकी अजून जिंवत आहे, असे रवी यांनी नमूद केले. 

यशोधन संस्थेच्या माध्यमातून अनेक निराधारांना 'आधार' दिला आहे. संस्थेला आजअखेर शासनाकडून कोणतीही मदत नाही. मात्र, देणगीदारांकडून वरचेवर मदत होत असते. घरातील नैराश्‍य, कौटुंबिक वाद, मानसिक आजाराने त्रस्त अशा नाना प्रकारच्या समस्यांनी अनेक तरुण-तरुणी नैराश्‍याच्या गर्तेत सापडले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम 'यशोधन' करत आहे. 

-रवी बोडके, यशोधन ट्रस्ट वेळे, सातारा .

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top