अखेरपर्यंत ब्रिटिश सरकारच्या हाती किसन वीर लागले नाहीत; आबासाहेब वीर पुरस्कार स्विकारताना गणपतराव देशमुखांनी सांगितला किस्सा

विलास साळूंखे | Sunday, 15 November 2020

एका आबासाहेबांच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्या आबासाहेबांना देताना मनस्वी आनंद होत आहे. पुलोद सरकारमध्ये भाई गणपतराव देशमुख आणि प्रतापराव भोसले यांनी एकत्र काम केले.

भुईंज (जि. सातारा) : क्रांतिवीर किसन वीर यांच्या स्वातंत्रपूर्व आणि स्वातंत्रोत्तर काळातील योगदानाची जाणीव मनात सदैव आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होत आहे. वास्तविक पुरस्कार स्वीकारणे मी थांबवले होते. मात्र, मदन भोसले यांनी आवर्जून या पुरस्कारासाठी निवड केली आणि आबासाहेब वीर यांच्या नावाचा हा पुरस्कार असल्याने तो आपण नम्रतेने स्वीकारत असून, जनतेला अर्पण करीत आहे, अशा भावना ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोले येथे व्यक्त केल्या. 

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देशभक्त आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सांगोले येथे शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर नुकताच प्रदान करण्यात आला. शाल, पुष्पहार, श्रीफळ, सन्मानपत्र व एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

श्री. देशमुख म्हणाले, ""महाराष्ट्राच्या प्रगतीच्या चळवळीत किसन वीर यांचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र प्राप्तीसाठी झगडलेल्या किसन वीर यांनी येरवड्याचा तुरुंग फोडला. त्या वेळी त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने मोठे बक्षीस ठेवले; पण ते अखेरपर्यंत त्यांच्या हाती लागले नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकार, शिक्षण, राजकारण या क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. किसन वीर यांचे नाव अजरामर राहावे, यासाठी मदन भोसले यांनी या परिस्थितीतही सांगोले येथे येऊन पुरस्कार प्रदान केला. त्यांची ही कृती कृतज्ञता कशी व्यक्त करावी, याचे उदाहरण असून, ते आता दुर्मीळ मानावे लागेल.''

ज्या आजीनं मांडीवर प्राण सोडला, त्याच आजीच्या तिरडीवरुन नाना पाटील पोलिसांना तुरी देत पसार झाले!

प्रास्ताविकात मदन भोसले म्हणाले, ""एका आबासाहेबांच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्या आबासाहेबांना देताना मनस्वी आनंद होत आहे. पुलोद सरकारमध्ये भाई गणपतराव देशमुख आणि प्रतापराव भोसले यांनी एकत्र काम केले. त्या वेळी 40 वर्षांपूर्वी प्रथमच त्यांची भेट झाली. आयुष्यभर विरोधी पक्षात राहूनही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने स्वत:चा दरारा आणि आदरयुक्त भीती निर्माण करण्याचे काम केले. निःस्पृहपणा काय असतो हे त्यांनी त्यांच्या आयुष्यातून दाखवून दिले.''
 
या वेळी गणपतराव देशमुख यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रतनताई देशमुख यांचाही साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शेतकरी सूतगिरणीचे अध्यक्ष नानासाहेब लिंगाडे, सांगोल्याच्या सभापती राणीताई कोलवले, सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती संगीता दांडोरे, सांगोले खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष पी. डी. जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरीश गंगाधडे, बाळासाहेब काटकर, नाना भोसेकर, साहेबराव ढेकळे, दादासाहेब बाबर, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष बाबासाहेब कारंडे, किसन वीरचे संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, मधुकर शिंदे, नवनाथ केंजळे, चंद्रसेन शिंदे, विजय चव्हाण, प्रकाश पवार, पुरस्कार निवड समितीचे सदस्य अनिल जोशी, रमेश डुबल, ऍड. प्रतापसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

पुस्तक दानातून वाचनसंस्कृतीला बळ : प्रदीप विधाते 

सन्मानपत्राचे वाचन एन. एम. काळोखे यांनी केले. मानपत्राचे लेखन राहुल तांबोळी यांनी केले. ऍड. प्रतापसिंह देशमुख यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार निकम यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब काटकर यांनी आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar