esakal | शशिकांत शिंदेंनाच नागरिकांच्या आरोग्याची काळजी; पालकमंत्र्यांकडून आमदारांचं कौतुक

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde

शशिकांत शिंदेंनाच नागरिकांच्या आरोग्याची काळजी; पालकमंत्र्यांकडून आमदारांचं कौतुक

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या एकंबे, बिचुकले, नलवडेवाडी (बिचुकले) या गावांतील बाधितांच्या स्वास्थ्याच्या काळजीपोटी आमदार शशिकांत शिंदे यांनी या गावांतील बाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराचे किट, ऑक्‍सिजन सिलिंडर आणि ऑक्‍सिजन मशिनची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा घेतलेला चांगला निर्णय कोरेगाव मतदारसंघातील नागरिकांसाठी दिलासादायक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वनिधीतून एकंबे येथील 500, बिचुकले येथील शंभर व नलवडेवाडी (बिचुकले) येथील 50 बाधित रुग्णांसाठी संपूर्ण औषधोपचाराचे किट, ऑक्‍सिजन सिलिंडर आणि ऑक्‍सिजन मशिनची व्यवस्था उपलब्ध करून दिली असून, पंचायत समितीमध्ये संबंधित गावांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते या साहित्याचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी सभापती संजय झंवर, रमेश उबाळे, डॉ. गणेश होळ, डॉ. नितीन सावंत आदी प्रमुख उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले,"" कोरेगाव मतदारसंघातील जनतेच्या स्वास्थ्याच्या काळजीपोटी वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी घेतलेला निर्णय दिलासादायक आहे.''

लोणंदची 'सोना' देणार महाराष्ट्राला 'संजीवनी'; अलॉयजमध्ये 15 टन ‘ऑक्सिजन’ची निर्मिती

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, "एकंबे गावामध्ये अधिकाधिक तपासण्या करण्याबाबतच्या सूचना केल्या. मी स्वत: गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि शासनाचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केलेल्या आरोग्य उपकेंद्रामध्ये चार बेड्‌सबरोबरच ऑक्‍सिजनची गरज असलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे.'' या वेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कोरेगाव शहराध्यक्ष सनी शिर्के, अजित बर्गे, बिचुकलेचे सरपंच प्रशांत पवार, एकंबेचे माजी सरपंच हणमंत मदने, बाळासाहेब कदम, केतन चव्हाण, अतुल चव्हाण, विकास शिंदे उपस्थित होते.

Edited By : Balkrishna Madhale