esakal | Satara : खासदार निंबाळकर जिल्हा बॅंकेच्या मैदानात
sakal

बोलून बातमी शोधा

Satara : खासदार निंबाळकर जिल्हा बॅंकेच्या मैदानात

Satara : खासदार निंबाळकर जिल्हा बॅंकेच्या मैदानात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीतील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या पाणीपुरवठा संस्थेतील पात्र ठरावांविरोधात माण तालुक्यातील जालिंदर खरात यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हे ठराव अपात्र करावे, अशी मागणी केली होती. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांचा निर्णय अंतिम ठेवला. त्यामुळे खासदार व आमदारांचे दोन्ही ठराव पात्र राहिले आहेत. त्यामुळे मजूर संस्था व पाणीपुरवठा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यावेळेस जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून, त्यांचा अनिल देसाईंशी सामना होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर या यादीवर हरकती व आक्षेप मागविले होते. या वेळी पाणीपुरवठा संस्थांतून खासदार निंबाळकर व आमदार गोरे यांचे ठराव जिल्हा बॅंकेने अपात्र यादीत टाकले होते. त्यास खासदार व आमदारांनी आक्षेप घेतला होता. त्यावर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी दोन्ही ठराव पात्र ठरविले होते. त्यामुळे अंतिम यादी प्रसिद्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला होता; पण त्याच्या आदल्या दिवशीच माण तालुक्यातील जालिंदर खरात यांनी हे दोन्ही ठराव अपात्र ठरवावे, अशी मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल होईपर्यंत अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करू नये, अशी सूचना न्यायालयाने केली होती. त्यामुळे अंतिम यादी प्रसिद्ध झाली नव्हती.

त्याच दरम्यान, याचिकेवर सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावत विभागीय सहनिबंधकांनी दिलेला निर्णय कायम ठेवला. त्यामुळे खासदार निंबाळकर व आमदार गोरे यांचे पाणीपुरवठा मतदारसंघातील ठराव पात्रच राहिले आहेत. आमदार गोरे व खासदार निंबाळकर यांच्या बाजूने ॲड. विजय पाटील, ॲड. विश्वजित सावंत, ॲड. अरुण खोत, ॲड. सिद्धार्थ करपे, ॲड. विश्वजित मोहिते यांनी युक्तिवाद केला. त्यामुळे आता जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या सोमवारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार आहेत.

निवडणूक कार्यक्रम सोमवारीच शक्य

जिल्हा बॅंकेची अंतिम मतदार यादी सोमवारी (ता. चार) प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवशी निवडणूक कार्यक्रमही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक प्रक्रियाही सोमवारपासूनच सुरू होऊ शकणार आहे. यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही पुढील आठवड्यातच सुरुवात होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top