मराठा आरक्षणप्रश्नी नोटीस देऊनही वेळ न मिळल्याने 'या' खासदारांचे पंतप्रधानांना पत्र!

सचिन शिंदे
Thursday, 17 September 2020

महाराष्ट्राच्या विधीमंडळाने मंजूर केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलेल्या एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाजात नाराजी आहे. यापुढे केंद्र शासनाने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेत स्वतः हून सहभाग घेऊन महाराष्ट्र शासन व मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घ्यावी, असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

कऱ्हाड (जि. सातारा) : मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत मांडण्यासाठी दोन दिवस नोटीस देऊन देखील वेळ मिळत नसल्याने अखेर खासदार श्रीनिवास पाटील यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी निवेदन दिले आहे. त्या माध्यमातून खासदार पाटील यांनी मराठा समाजातील नाराजीकडे पंतप्रधान मोदी यांचे लक्ष वेधले आहे. राज्य शासन व मराठा समाजाच्या बाजूने केंद्र सरकारने भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्या अधिवेशनासाठी खासदार उपस्थित आहेत. खासदार पाटील यांनीही सभागृहात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात मराठा आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा लोकसभेत मांडण्यासाठी दोन दिवस त्यांनी नोटीस दिली आहे, तरीही त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे खासदार पाटील यांनी त्याबाबतचे लेखी निवेदन पंतप्रधान मोदी यांना दिले आहे. 

पोलीस भरती रद्द करा; सातारचे राजे सरकारवर भडकले!

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या विधिमंडळाने मंजूर केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केलेल्या एसईबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे मराठा समाजात नाराजी आहे. यापुढे केंद्र शासनाने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रक्रियेत स्वतः हून सहभाग घेऊन महाराष्ट्र शासन व मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घ्यावी. त्यामुळे मराठा आरक्षण मिळण्यासाठी पाठबळ मिळेल. मराठा आरक्षण संदर्भात यापुढेही संसदेतील विविध नियमांचा वापर करून याबाबत बोलता यावे व मराठा समाजाची बाजू मांडता यावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Shrinivas Patil's Letter To PM On Maratha Reservation Issue Satara News