खूनप्रकरणी संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कोठडी

खूनप्रकरणी संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी

वहागाव - अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या वहागाव येथील ३२ वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी अटक केलेल्या संशयिताला आज तळबीड पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. रोहित रमेश पवार (वय २७, रा. वहागाव) असे खूनप्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तर बरकत खुदबुद्दीन पटेल (वय ३२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांची माहिती अशी, वहागाव येथील बरकत पटेल गेल्या आठ दिवसांपूर्वी शुक्रवारी राहत्या घरातून बेपत्ता होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचे मित्र व इतर नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्याचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे त्याच्या पत्नीने याबाबतची तक्रार तळबीड पोलिसांत दिली होती. त्यानंतर गावातील रोहित रमेश पवार याचे बरकत पटेलच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे व त्यातून बरकत पटेल याचे त्याच्या पत्नीशी व रोहित याच्याशी अनेक वेळा वाद झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते.

त्यानुसार शुक्रवारी (ता.३) पोलिसांनी संशयित आरोपीकडे घातपाताच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता रोहित पवारने बरकत पटेल याचा आठ दिवसांपूर्वी रात्री उशिरा डोक्यात वर्मी घाव घालून खून केल्याचे व नंतर तो मृतदेह वहागावच्या हद्दीतील महामार्गाच्या पश्चिमेला खोडदरा नावाच्या शिवारातील ओघळीत पुरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी रोहित पवारला या खूनप्रकरणी अटक केली. दरम्यान, तळबीड पोलिसांनी आज संशयिताला कऱ्हाडच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सहायक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील या घटनेचा तपास करीत आहेत.

दरम्यान, रोहित पवारने बरकत पटेल याचा खून करण्यासाठी व त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी वापरलेल्या आपल्या चारचाकी जीपसह अन्य साहित्य पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आज जप्त केले. पोलिसांनी आज घटनास्थळावरील रक्ताचे नमुने घेतले आहेत. या खूनप्रकरणात बरकत पटेलच्या पत्नीचा व आणखी कोणाचा सहभाग आहे का? यादृष्टीने पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. सध्या मयत बरकत पटेल याची पत्नी व अन्य संशयित फरारी झाल्याची चर्चा परिसरात जोमाने सुरू आहे.