स्वबळावर की महाविकास आघाडी? बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP agriculture market committee elections Alliance Satara politics

स्वबळावर की महाविकास आघाडी? बाजार समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरली

सातारा : जिल्ह्यातील बाजार समितींच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या ठिकाणी स्वबळावर, तर इतर ठिकाणी महाआघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय सोमवारी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीत घेतला. बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर्याने घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा निर्धार पक्षाच्या आमदारांनी केला आहे.

राष्ट्रवादी भवनात आज बाजार समितीच्या निवडणुकीसाठीची नियोजन बैठक माजी सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर, राजाभाऊ उंडाळकर, सारंग पाटील, प्रदीप विधाते, मनोज पोळ, बाळासाहेब सोळसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील नऊ बाजार समितींची निवडणूक होत असून, आजपासून अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरविण्यात आली. वाई, लोणंद व जावळी- महाबळेश्वर या तीन बाजार समितींच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांना लक्ष घालावे लागणार आहे. येथे राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे.

त्यामुळे त्यांना जास्त लक्ष घालावे लागणार आहे, तर कोरेगाव बाजार समितीत राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढेल. येथे महाविकास आघाडीची त्यांना साथ मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. फलटण बाजार समितीत आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर यांचे राजे गटाचे स्वतंत्र पॅनेल असेल.

सातारा बाजार समितीत राष्ट्रवादीची ताकद नाही, त्यामुळे येथे अन्य कोणासोबत युती करून निवडणूक लढता येते का, याची चाचपणी होणार आहे. पाटणला विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे पॅनेल उभे राहू शकते का, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मेढा बाजार समितीत दीपक पवार यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी एकत्रितपणे पॅनेल टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. कऱ्हाड बाजार समितीत बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे पॅनेल टाकणार आहेत.

खटाव बाजार समितीत काँग्रेससोबत राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा प्रयोग करेल. तो यशस्वी न झाल्यास स्वबळावर लढणार आहे. एकूणच बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर्याने घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचा निर्धार आमदारांनी केला आहे.

या वेळी राजकुमार पाटील, नंदकुमार मोरे, सुरेंद्र गुदगे, अभयसिंह जगताप, बाळासाहेब सावंत, सतीश चव्हाण, कविता म्हेत्रे, संजना जगदाळे, समिंद्रा जाधव, स्मिता देशमुख, सीमा जाधव, नलिनी जाधव, हेमलता निंबाळकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :SataraNCP