सातारा : 702 कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात; आतापर्यंत 15 मृत्यू तर 15 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू, बाधित रुग्णांची संख्या आटोक्‍यात

प्रशांत घाडगे
Friday, 4 December 2020

जिल्हा परिषदेत गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामध्ये सामान्य प्रशासन, रोजगार हमी, बांधकाम, अर्थ, समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण यांसह इतर विभागांतील बाधित रुग्णांचा समावेश आहे.

सातारा : जिल्हा परिषदेत विविध विभागांत कार्यरत असलेल्या 702 कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, 15 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. सध्याची जिल्हा परिषदेतील आकडेवारी पाहता बाधित रुग्णांची संख्या आटोक्‍यात आल्याचे दिसत आहे. 

हे ही वाचा : माझेरी जिल्हा परिषद शाळेचे 19 विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

जिल्हा परिषदेत गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामध्ये सामान्य प्रशासन, रोजगार हमी, बांधकाम, अर्थ, समाजकल्याण, आरोग्य, शिक्षण यांसह इतर विभागांतील बाधित रुग्णांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच मागील आठ महिन्यांत सातारा तालुक्‍यात 131, कऱ्हाड 109, कोरेगाव 121, वाई 47, पाटण 74, खटाव 58, माण 30, खंडाळा 32, फलटण 42, महाबळेश्‍वर 33, जावळी तालुक्‍यात 25 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, जिल्ह्यातील खटाव तालुक्‍यात सर्वाधिक चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

हे ही वाचा : कार्यकर्त्यांनी आंदाेलनकाळात फाेडल्या बसच्या काचा; खाेत, शेट्टी वाई न्यायालयात हजर 

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव म्हणाले, 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. तसेच कोरोनाबाबत मास्कचा वापर, सामाजिक अंतर व वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीची नागरिकांमध्ये जनजागृती केली. यामध्ये आरोग्य विभाग, महसूल, अंगणवाडी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व इतर सर्वच विभाग कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.' 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients is declining in Satara