Look Back 2020 : लाचेत 'महसूल' सुसाट; पोलिसांचा नंबर दाेन

संजय शिंदे t@ssanjaysakaal | Friday, 1 January 2021

लाच मागणाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनेक पर्याय दिले आहेत. 1064 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. त्याचसह दूरध्वनी 02162-238139 येथे संपर्क साधावा, तसेच एसीबी महाराष्ट्र नावाने संकेतस्थळावरही तक्रार करू शकता, असे पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला यांनी सांगितले.

सातारा : सातारा लाचलुचपत विभागाने वर्षभरात सापळे रचून 36 लाचखोरांना अटक केली आहे. त्यामध्ये महसूल विभागाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पहिला क्रमांक सोडला नाही. पोलिस विभागाने दुसरा क्रमांक मिळवत लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे एका "क्‍लास वन'अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कोरोना संकटकाळात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाचखोरीत आघाडी घेतली आहे.
 
सर्वसामान्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी लाचखोरीत आघाडीवर असल्याचे दिसून येते. त्यामध्ये महसूल विभाग आघाडीवर असून, पोलिस विभाग दुसऱ्या स्थानी आहे. महसूल विभागातील सर्वाधिक सात जणांना अटक करण्यात आली होती, त्या खालोखाल पोलिस विभागातील पाच जणांना अटक झाली होती. विधी व न्याय खाते, नगरविकास खाते, ग्रामविकास, एमएसईबी, वन विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रत्येकी एकावर कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय सरपंच, पत्रकार, आरटीओ एजंट अशा लाचलुचपत विभागाच्या 23 कारवायांत 36 जण जाळ्यात अडकले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण-विलासराव पाटील उंडाळकरांचे मनोमिलन यशस्वी; अपक्षांचे आव्हान 
 
"क्‍लास थ्री'मधील लोकसेवकांचे लाचखोरीत प्रमाण जास्त असून 20 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. "क्‍लास टू'च्या तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. एका क्‍लास वन अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सात खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली होती. विशेष म्हणजे दोन सरपंचांवरही कारवाई करण्यात आली आहे. भ्रष्टाचार करण्यात महसूल विभागाने यंदाही प्रथम क्रमांक मिळवला आहे. गेल्या वर्षीही 27 कारवायांत महसूल विभागातील नऊ जण जाळ्यात सापडून पहिला क्रमांक मिळवला होता.

साता-यातील सैनिकाच्या मृत्यूप्रकरणी पुण्यात खुनाचा गुन्हा दाखल 
 
गेल्या वर्षीपेक्षा कारवाईचा टक्का थोडा कमी झाला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. कोरोना संकटकाळात सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाचखोरीत आघाडी घेतली आहे. कोरोना संकटकाळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी या काळात काम करून देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी करून अडवणूक करण्यात आली. कोरोनाच्या काळात डॉक्‍टर, नर्स, पोलिस, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, होमगार्ड, तलाठी, पालिकांसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हात कोरोना "वॉरिअर्स' म्हणून काम करत असताना काही भ्रष्ट लोकसेवकांनी लाच घेतली आहे. एकीकडे डॉक्‍टर, नर्स व प्रामाणिक पोलिस जिवाची बाजी लावून कोरोनाशी लढत असताना दुसरीकडे याच काळात लाच घेऊन स्वतःची घरे भरण्याचे काम काही झारीतील शुक्राचार्य करत आहेत. 

Advertising
Advertising

वर्षनिहाय झालेल्या कारवाया

2016 28
2017 29
2018 29
2019 27
2020 23

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर नागरिकांचा विश्‍वास वाढला आहे. शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी करीत असेल तर तत्काळ तक्रार करा. 

- अशोक शिर्के, पोलिस उपअधीक्षक, सातारा, एसीबी 

वर्ष 2020 मध्ये लाचखोर अधिकाऱ्यांवरील कारवाई

 

क्‍लास वन 01
क्‍लास टू 03
क्‍लास थ्री 20
क्‍लास फोर 01
एकूण

25

Edited By : Siddharth Latkar