पाचगणीच्या नगराध्यक्षांना डिवचणे राष्ट्रवादीच्या 'या' गटास पडले महागात

रविकांत बेलोशे | Thursday, 9 July 2020

पालिकेचा कारभार चालवताना कऱ्हाडकर यांनी मात्र त्यांना असलेला कास्टिंग व्होटचा अधिकार चाणाक्ष खेळ्यांनी अनेकदा केंद्रस्थानी आणला. त्यामुळे सध्या शहरात याचीही चर्चा सुरू झाली आहे. 

भिलार (जि.सातारा) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकदम चिडीचूप झालेले पाचगणी शहर पालिकेत बहुमतात असलेल्या विरोधी गटाच्या फुटीने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आमदार मकरंद पाटील यांनी जमवाजमव करून एकत्रित आणलेल्या तेरा जणांच्या गटाचे तीन-तेरा वाजले असून लक्ष्मी कऱ्हाडकर यांचे पारडे पुन्हा एकदा जड झाले आहे. पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत त्याची प्रचिती आली.
सातारा जिल्ह्यात 67 कोरोनाबाधित; सारीचे रुग्ण वाढताहेत
 
पालिकेच्या सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. अगोदर विविध विषयांपैकी प्रत्येक विषयावर बहुमतात असलेले विरोधक प्रत्येकवेळी नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत होते. असाच हा प्रकार घडण्याची अपेक्षा होती. पूर्वी नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांच्याकडे चार आणि विरोधात 13 नगरसेवक होते. परंतु, विरोधातील चार नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने समसमान मते पडली. शेवटी कास्टिंग मतांच्या जोरावर कऱ्हाडकर यांनी ठराव मंजूर करून घेतला. यावरून कऱ्हाडकर यांचा चाणाक्षपणा दिसून आला आणि मोठा गाजावाजा करीत आमदार मकरंद पाटील यांनी केलेली जुळवाजुळव अखेर फुटल्याचे समोर आले.
 
या सभेत 15 विषयांवर चर्चा झाली. नगरपालिका मालकीच्या टाउनहॉलचे अतिवृष्टीमध्ये नुकसान झाल्याने त्याची दुरुस्ती करण्याबाबत विचार करण्याच्या विषयावर जोरदार खडाजंगी झाली. विरोधकांनी हा विषय लावून धरला. परंतु, हा ठराव अध्यक्षांनी मतदानावर टाकला. कऱ्हाडकर यांच्या बाजूने विरोधातील विनोद बिरामणे, अनिल वन्ने, पृथ्वीराज कासुर्डे, रेखा कांबळे या चौघांनी मतदान केल्याने समसमान मते पडली. त्यामुळे अध्यक्षांनी कास्टिंग मतांच्या जोरावर हे ठराव मंजूर करून घेतले. त्याचबरोबर मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, नगरपरिषद प्रवासी कर विभागाच्या प्रवासी वसुलीबाबत प्राप्त झालेल्या कार्यालयीन अहवालावर विचार करून निर्णय घेणे, नगरपालिका कार्यालयामधील विविध विभागांमध्ये मुदतीत प्राप्त झालेल्या निविदांचा विचार करणे, नगरपालिकेचे सावंत भाजी मार्केट व इतर ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक दुरुस्ती करण्याबाबत विचार करून निर्णय घेणे, नैसर्गिक आपत्तीमुळे भाजी मंडई येथे पडलेल्या झाडांमुळे पालिकेच्या मालकीच्या भाजीवाला बाजार रोडचे अँगल तसेच पत्र्याचे नुकसान झाले आहे, त्याची दुरुस्तीबाबत विचार करणे, नगरपरिषद मालकीच्या मटण मार्केटमध्ये दुकान गाळा भाड्याची रक्कम परत मिळणेबाबत आलेल्या अर्जाचा विचार करून निर्णय घेणे, पालिका हद्दीतील धोकादायक झाडांची खडसणी करण्याबाबत निर्णय घेणे, जेनी स्मिथ वेल्फेअर यांना दिलेल्या मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण करणे तसेच कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या कामाचा ठेका संपल्याने त्यावर निर्णय घेणे, शांतीनगर अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करणे तसेच कोविड-19 अंतर्गत पालिकेतर्फे केलेल्या निर्जंतुकीकरण आणि उपाययोजनांवर कार्योत्तर खर्चास मान्यता देणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली. हे सर्व विषय नगराध्यक्षांनी कास्टिंग व्होटवर मंजूर करून घेतले. या सभेस सर्व नगरसेवकांबरोबरच नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी गिरीश दापकेकर उपस्थित होते. 
लोकहिताच्‍या कामांसाठी गरज असेल तेथे मी स्वत: उभा राहीन

कास्टिंग व्होटच केंद्रस्थानी 

कोणत्याही सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधकांकडून राजकीय डावपेच आखले जातात. पाचगणीचे राजकारणही त्याला काही अपवाद नाही. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपासून नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांना अशाच राजकारणाद्वारे नामोहरम करण्याची संधी बहुमतातील विरोधक साधत असतानाच, पालिकेचा कारभार चालवताना कऱ्हाडकर यांनी मात्र त्यांना असलेला कास्टिंग व्होटचा अधिकार चाणाक्ष खेळ्यांनी अनेकदा केंद्रस्थानी आणला. त्यामुळे सध्या शहरात याचीही चर्चा सुरू झाली आहे. 

त्यांनी राष्टवादीत जाऊन नगराध्यक्षपद पटकाविले, आता भाजपात गेलेत खरे; पण...

राष्ट्रवादीची राष्ट्रवादीकडूनच धुळधाण... भाजपला अच्छे दिन

मतदारसंघातील आरोग्य सेवेबाबत आमदारांची नाराजी

संपादन - सिद्धार्थ लाटकर