Satara News : वाईत पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर|parking issue traffic police satara kiran kumar more | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara News : वाईत पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Satara News : वाईत पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

वाई : शहरात सर्वत्र वाहतूक समस्या जाणवते, वाहतूक कोंडीही जागोजागी होते. त्याचे मुख्य कारण ‘पार्किंग’ची समस्या हे आहे. वाहनांची वाढती संख्या, रस्त्यावरील अतिक्रमणे व बेशिस्त पार्किंग यामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियोजन आराखडा तयार आहे. मात्र पालिका व पोलिस प्रशासनांच्या दुर्लक्षामुळे

हा आराखडा कागदावर राहिला आहे. दक्षिणकाशी व तीर्थक्षेत्र वाई शहरात कृष्णाकाठावर असलेल्या महागणपतीच्या दर्शनासाठी व परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी अनेक भाविक व पर्यटक, तसेच ग्रामीण भागातील लोक खरेदी व कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर वाहने घेऊन येतात. याचा शहरातील वाहतुकीवर ताण येत असतो.

सोमवारी आठवडा बाजारा दिवशी व सुट्यांच्या कालावधीत येणाऱ्या पर्यटकांमुळे महागणपती परिसरात सर्वच बाजूने वाहने येत असतात. याठिकाणी दोन्ही बाजूस असलेल्या ‘पे अँड पार्क’ वाहन तळातून येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांमुळे महागणपती पुलावर वाहतुकीची कोंडी नित्याची बनली आहे.

याशिवाय किसन वीर, चित्रा टॉकीज, ग्रामीण रुग्णालय, विष्णू मंदिर येथील चौकांत, भाजी मंडई, बस स्थानक परिसरात प्रामुख्याने वाहतुकीची प्रचंड समस्या भेडसावते आहे. वाहनधारकांबरोबरच पादचारी व सायकलस्‍वारांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. अरुंद रस्ते त्यातच वाहन तळाची सोय नसल्याने बहुतेक वाहने रस्त्यावर उभी असतात.

मागील काही वर्षांत शहरात अनेक खासगी, तसेच पालिकेची व्यापारी व निवासी संकुले उभी राहिली. त्या वेळी तत्कालीन पदाधिकारी व प्रशासनाने या संकुलामध्ये पार्किंगची व्यवस्था करण्याची दूरदृष्टी दाखवली नाही. काहींनी पार्किंगच्या जागेत दुकान गाळे काढले.

महात्मा फुले मंडईच्या जुन्या जागेत बहुमजली ‘पे आणि पार्क’ इमारतीचा सुमारे तीन कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाली, की निविदा काढून त्वरित काम सुरू करण्यात येणार आहे.

किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी