आदर्शवत! बहिणीच्या स्मरणार्थ रुग्णांना मोफत 'श्वास'

प्रशांत गुजर | Sunday, 13 September 2020

तहसीलदार पाटील यांनी जेधे कुटुंबीयांचे आभार मानून त्यांनी ऑक्‍सिजन मशिन देऊन दाखविलेल्या दातृत्वामुळे आज अनेक लोकांचे जीव वाचणार आहेत. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असेही त्यांनी नमूद केले.

सायगाव (जि. सातारा) : कोरोनाच्या उपचारात मदत व्हावी म्हणून येथील छायाचित्रकार योगेश जेधे यांनी आपल्या बहिणीच्या स्मरणार्थ सायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्‍सिजन मशिन भेट दिले. तहसीलदार शरद पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भगवान मोहिते, डॉ. मुंडेकर यांच्याकडे ते नुकतेच सुपूर्द केले. 

कोरोनाच्या उपचारासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने ऑक्‍सिजन मशिनसाठी आवाहन करण्यात आले होते. आपल्या बहिणीचा एक वर्षापूर्वी अशाच काही कारणांमुळे मृत्यू झाल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन याकाळात ऑक्‍सिजनची गरज किती महत्त्वाची असते हे ओळखून श्रीमती कुसुम जेधे, योगेश जेधे व त्यांची पत्नी अर्चना जेधे या जेधे कुटुंबीयांनी आपली बहीण (कै.) विद्या अतितकर यांच्या स्मरणार्थ समाजातील गरज ओळखून ऑक्‍सिजनअभावी कोणाचा मृत्यू होऊ नये ही भावना मनात ठेऊन ही मशिन भेट दिली. 

बिबट्यांच्या जोडीची दहशत; तळबीडसह वहागावचे शेतकरी हतबल

या वेळी तहसीलदार पाटील यांनी जेधे कुटुंबीयांचे आभार मानून त्यांनी ऑक्‍सिजन मशिन देऊन दाखविलेल्या दातृत्वामुळे आज अनेक लोकांचे जीव वाचणार आहेत. त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. मोहिते यांनी कोरोना संकटाचा सामना सर्वांनी मिळून करायचा असल्याने आशा प्रकारे युवकांनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन केले. सुहास भोसले यांनी या विभागातून आम्ही जास्तीत-जास्त मशिन देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले. या वेळी धनंजय गोरे, राहुल देशमाने, नीलेश गायकवाड, श्रीशैल्य जेधे, हणमंत जकाते, दत्ता गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. हणमंत जकाते यांनी आभार मानले. 
 
संपादन : बाळकृष्ण मधाळे