चोर सोडून संन्याशाला फाशी! खर्शीत उत्खननप्रकरणी क्षेत्रमालकांना दंड

चोर सोडून संन्याशाला फाशी! खर्शीत उत्खननप्रकरणी क्षेत्रमालकांना दंड

सायगाव (जि. सातारा) : खर्शी तर्फ कुडाळ (ता. जावळी) येथे गणपती माळावर ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अवैध मुरूम उत्खननप्रकरणी महसूल विभागाने संबंधित क्षेत्रमालक शेतकऱ्यांना 16 लाख 95 हजार रुपये दंड करून प्रत्यक्षामध्ये उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांना मोकळे सोडल्याने "चोर सोडून संन्याशाला फाशी' अशी परिस्थिती झाली आहे. 

गणपती माळ परिसरात उत्खनन झाल्यानंतर कुडाळच्या मंडलाधिकाऱ्यांनी एकाच जागेचे दोन वेगवेगळे पंचनामे सादर केले. यामध्ये तफावत आढळून आल्याने तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी अचूक उत्खननाची आकडेवारी मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यांनी पंचनामा करून 314 ब्रास अवैध उत्खनन झाल्याचा अहवाल तहसीलदारांकडे सादर केला. त्या अनुषंगाने निर्णय देत तहसीलदार पोळ यांनी कुडाळ येथील गट नंबर 808 मधील शेतकरी नंदकुमार लक्ष्मण गायकवाड, मानसिंग रामचंद्र गायकवाड यांना 16 लाख 95 हजार रुपये दंड शासकीय तिजोरित भरण्यास नोटीस बजावली आहे. 

दरम्यान, कारवाईच्या भीतीने ठेकेदाराने संबंधित शेतकऱ्यांकडून उत्खननावेळी जेसीबीसारखी वाहने घटनास्थळी नव्हती, असे लेखी लिहून घेतल्याचे नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे तहसीलदार पोळ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. शेतकरी स्वतःकरिता एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन करू शकत नाही. या उत्खननामधील मुरूम व्यावसायिक कामासाठी वापरला असून, त्यासाठी अनेक ट्रॅक्‍टर, ट्रॉलींचा वापर व जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन झाल्याचे दिसत आहे. 

दंडाची रक्कम ठेकेदाराकडून वसूल करा 

दरम्यान, मुरूम उत्खननप्रकरणी ठेकेदार सहीसलामत सुटले आणि शेतकऱ्यांवर कारवाई झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. दंडाची रक्कम ही शेतकऱ्यांकडून वसूल न करता संबंधित उत्खनन करणारे ठेकेदार, जेसीबी व ट्रॅक्‍टर चालकांकडून वसूल करावी, अन्यथा अशा ठेकेदारांची 'दादागिरी' वाढून गरीब शेतकरी वर्गावर अन्याय होणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com