एकतर्फी प्रेमातून बाळाचा खून; तडवळ्यातील 28 वर्षीय युवकाला अटक

एकतर्फी प्रेमातून बाळाचा खून; तडवळ्यातील 28 वर्षीय युवकाला अटक

सातारा : काळज (ता. फलटण) येथील ओम त्रिंबक भगत (वय 10 महिने) या बाळाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आज युवकाला अटक केली. ओमच्या आईवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. अभिजित रामदास लोखंडे (वय 28, रा. तडवळे, ता. फलटण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याने ओमचा खून केल्याची कबुलीही दिली आहे. 

साताऱ्यात पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत या घटनेचा उलगडा केला. काळजमध्ये त्रिंबक भगत हे पत्नी, चार मुली व दहा महिन्यांच्या ओमसमवेत राहात होते. मंगळवारी (ता. 29) दुपारी काळजमधील राहत्या घरातून ओमचे अज्ञाताने अपहरण केले होते. ओमचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी लोणंद पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करत अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला होता. परिसरातील गावे पिंजून काढत पोलिसांनी प्रमुख मार्गांवर असणाऱ्या सीसीटीव्हीचे फुटेज्‌ तपासले होते. शोधकार्याबरोबर तपास सुरू असतानाच काल (ता. 1) सकाळी भगत यांच्या घरापासून 100 फूट अंतरावर असणाऱ्या विहिरीत ओमचा मृतदेह तरंगताना आढळला. त्याचा मृतदेह सापडल्याने हे कृत्य गावातील किंवा भगत कुटुंबीयांशी संपर्कात असलेल्याने केल्याच्या निष्कर्षावर पोलिस पोचले. 

पोलिसांनी गावातील अनेकांकडे चौकशी करत भगत कुटुंबीयांच्या अनुषंगाने माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. या चौकशीत अभिजित लोखंडेची माहिती मिळाली. पोलिसांनी कालच सकाळी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तो पोलिसांना प्रत्येकवेळी वेगवेगळी माहिती देत होता. लोखंडे हा दिशाभूल करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला पोलिसी खाक्‍या दाखवल्यानंतर त्याने ओमचे अपहरण केल्यानंतर काही वेळातच त्याला घराजवळ असणाऱ्या विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांना त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ओमचे वडील आणि लोखंडेची दूध आणि भाजीपाला व्यवसायावरून ओळख होती. त्यावरून लोखंडे हा भगत यांच्या घरी येत होता. त्यातून त्याची ओमच्या आईशी ओळख झाली. ओळखीनंतर लोखंडेने ओमच्या आईशी फोनवर वारंवार संपर्क साधत घसट वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. 

वारंवार फोन करणे, मेसेज पाठवणे, पाठलाग करणे, घरी येऊन जाणे असे प्रकार लोखंडे हा वारंवार करत होता. या घटनांमुळे ओमची आई त्रस्त झाली होती. तिने असे प्रकार थांबविण्याची समजही त्याला दिली होती. कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने लोखंडे हा सुडाच्या भावनेने पेटला होता. त्याने 27, 28 सप्टेंबर या दोन दिवशी भगत यांच्या घरावर पाळत ठेवली. भगत कुटुंबिय हे मंगळवारी घराला लागून असणाऱ्या शेतातील बाजरी काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी ओमला त्याच्या आईने घरातील पाळण्यात झोपवले होते. याचदरम्यान लोखंडे हा त्या ठिकाणी आला व त्याने घरात कोणीही नसल्याचे पाहून झोपेत असणाऱ्या ओमला पाळण्यातून उचलले. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून तो भगत यांच्या घरातून ओमला घेऊन बाहेर आला व घराजवळच असणाऱ्या विहिरीत त्याला फेकून देत पळ काढला. 

अभिजितची सलग 15 तास चौकशी 
ओमच्या अपहरणप्रकरणी चौकशीसाठी काल सकाळी नऊ वाजता अभिजित लोखंडेला पोलिसांनी ताब्यात घेतले. पहिल्यांदा तो पोलिसांच्या चौकशीला कोणतीही दाद देत नव्हता. चौकशीदरम्यान प्रत्येक टप्प्यावर लोखंडे हा वेगवेगळी माहिती कथानक स्वरूपात पोलिसांना सांगत होता. दिशाभूल करत असल्याचे समोर आल्यानंतर त्याला पोलिसी खाक्‍या दाखविण्यात आला. त्यानंतर त्याने मध्यरात्री बाराच्या सुमारास ओमच्या खुनाची कबुली दिली. अभिजितने यापूर्वी दोन वेळा पोलिस भरतीसाठी प्रयत्न केले होते. प्रत्येक प्रयत्नात त्याला एक ते दोन गुणांनी अपयश आले होते. 

तब्बल 12 पोलिस पथके कार्यरत 
ओमच्या अपहरण प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक सातपुते यांनी 12 पथके तयार केली होती. प्रत्येक पथकाचा आढावा घेण्यासाठी धीरज पाटील हे दोन दिवस लोणंदमध्ये तळ ठोकून होते. या पथकांच्या एकत्रित प्रयत्नातून लोखंडेला अटक करण्यात यश आले. या कारवाईत परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळ, उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, नानासाहेब कदम, लोणंदचे संतोष चौधरी, पुसेगावचे विश्‍वजित घोडके, हणमंत गायकवाड, मेढ्याचे निळकंठ राठोड, औंधचे उत्तम भापकर, भाविकट्टी, सहायक फौजदार उत्तम दबडे, कर्मचारी महेश सपकाळ, तानाजी माने, शरद बेबले, जितेंद्र शिंदे, प्रवीण फडतरे, राजकुमार ननावरे, मुनीर मुल्ला, रवी वाघमारे, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, नीलेश काटकर, गणेश कापरे, अविनाश चव्हाण, विशाल पवार, मयूर देशमुख, धीरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, श्रीनाथ कदम, विजय सावंत, संजय जाधव, पंकज बेसके, गणेश कचरे, महिला कर्मचारी मोना निकम, नूतन बोडरे हे सहभागी झाले होते. 

बदनामीची भीती अन्‌ अभिजितचे धाडस 
एकतर्फी प्रेम झाल्यावर अभिजित हा वारंवार ओमच्या आईचा पाठलाग करत होता. पाठलाग करूनही ओमची आई प्रतिसाद देत नसल्याने त्याने फोन, मेसेज पाठवणे सुरू केले. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अभिजित हा संतापला होता. वारंवारच्या त्रासामुळे ओमच्या आईने अभिजितला खडसावले होते. या प्रकाराबाबत आपण कुटुंबीयांना सांगितल्यास आपलीच बदनामी होऊन चारित्र्याची शंका येईल, या भीतीने ओमच्या आईला ग्रासले होते. या भीतीमुळेच अभिजितचे धाडस वाढले आणि निष्पाप ओमला आपले प्राण गमवावे लागले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com