esakal | भर पावसात पोलिसांनी जप्त केली 13 किलो गांजाची झाडे
sakal

बोलून बातमी शोधा

Cannabis Plants

भर पावसात पोलिसांनी जप्त केली 13 किलो गांजाची झाडे

sakal_logo
By
टीम सकाळ

पाटण (जि. सातारा) : मोरणा विभागामध्ये भर पावसात पाटण पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 किलो 130 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली. तीन शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी गांजाचे उत्पादन किती वर्षांपासून सुरू आहे, राजरोस चाललेल्या गांजा शेतीचा दरवळ कोणाला आजपर्यंत का कळाला नाही आणि गांजाच्या शेतीला खतपाणी कोण घालत होते, यांचा तपास होणे गरजेचे आहे.

मोरणा विभाग तसा पूर्वीपासूनच अवैध धंद्यांना पाठबळ देणारा आहे. याच विभागात काही वर्षांपूर्वी गावठी दारूच्या भट्ट्या राजरोसपणे चालू असायच्या. या विभागातील गावठी दारू पोलिसांच्या आशीर्वादाने ढेबेवाडी विभागासह जिल्ह्यात जात होती. गावठी दारूवर नियंत्रण यायला लागले आणि नरक्‍या तस्करीने हा विभाग चर्चेत आला. नरक्‍या तस्करीचे पुढे काय झाले, याबाबत जनतेत अजून संशयाचे वातावरण पाहावयास मिळते.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मोरणा-गुरेघर धरणालगत असणाऱ्या धावडे गावच्या शिवारात भर पावसात पोलिसांनी गांजाच्या शेतीत धडक मोहीम राबविली. मिळालेल्या माहितीची खात्री करण्यास साध्या वेशात गेलेल्या पोलिसांनी खात्री होताच कारवाई केली. मात्र, या गांजाची कोठे विक्री केली जात होती? संशयित तिघांव्यतिरिक्त अजून किती क्षेत्रात गांजा पिकत आहे? याचा शोध घेऊन पोलिसांनी त्यातील वास्तव समोर आणणे गरजेचे आहे.

गांजाचे बी पाण्यातून आले वाहून?

मोरणा-गुरेघर धरणाचे पाणी शिवारात खळाळत आहे. मात्र, उसासह इतर पिकांना नसणारा बाजारभाव, वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान, तुटपुंजी मिळणारी पीक नुकसानीची भरपाई यामुळे शेतकरी गांजा शेतीकडे वळला का? असाही सूर सध्या उमटत आहे. त्याचबरोबर गांजाची नशा करणारांनी फेकलेले गांजाचे बी पाटाच्या पाण्यातून शेतात जाऊन त्याची उगवण झाल्याने झाडे तयार झाली असावीत, अशीही सध्या चर्चा सुरू आहे.

Edited By : Balkrishna Madhale