अभिमानास्पद! नव्या संसद निर्मितीत महाराष्ट्राची छाप; सातारच्या प्रकाशकडं सोपवलं फॅब्रिकेशनचं काम I Satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Parliament Building Prakash Shelar

नव्या संसद भवनाच्या निर्मितीत एका सातारकराला आपले योगदान देण्याची अपूर्व संधी लाभली आहे.

Satara : अभिमानास्पद! नव्या संसद निर्मितीत महाराष्ट्राची छाप; सातारच्या प्रकाशकडं सोपवलं फॅब्रिकेशनचं काम

नागठाणे : जीवनाच्या कितीतरी क्षेत्रांत ‘सातारी ठशा’चे दर्शन हमखास पाहावयास मिळते. नव्या संसद भवनाच्या निर्मितीतही एका सातारकराला आपले योगदान देण्याची अपूर्व संधी लाभली आहे. ती यशस्वीपणे पेलली गेली.

प्रकाश मारुती शेलार (Prakash Maruti Shelar) हे त्यांचे नाव. श्री. शेलार हे सातारा तालुक्यातील परळी विभागातील पाटेघर या गावचे रहिवासी. व्यवसायाच्या निमित्ताने सध्या त्यांचे मुंबईत वास्तव्य असते.

गेली २० वर्षे ते मेटल फॅब्रिकेशनच्या (Metal Fabrication) उद्योगात कार्यरत आहेत. मुंबईतील विविध नामवंत सिनेकलावंत, राजकीय व्यक्तीची घरे त्याचबरोबर भव्य इमारती, सिनेमागृहे, मॉल्स आदी ठिकाणी श्री. शेलार यांनी स्टील फॅब्रिकेशनच्या कामांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कामातील सुबकता, नावीन्यपूर्ण कलाकृती, वक्तशीरपणा आदींमुळे त्यांचा लौकिकही सर्वदूर पोचला आहे. त्यातूनच गेल्या वर्षी त्यांना नवीन संसद भवनाच्या निर्मितीत योगदान देण्याची संधी लाभली. त्यात संसद भवनाच्या लोकसभा अन् राज्यसभेतील खासदारांच्या बाकावर असलेल्या नावाच्या पाट्या बनविण्यासह अन्य फॅब्रिकेशन कामांची जबाबदारी श्री. शेलार यांच्यावर सोपवली.

त्यांनी ते काम वेळेत पूर्णत्वास नेले. संसद भवनचे मुख्य कंत्राटदार नरसी, इंटेरियर विभागाचे श्री. नरसी, कमल सुतार, दिनेश सुतार तसेच सहकारी संतोष कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

नव्या संसद भवनाच्या निर्मितीत अल्प प्रमाणात का होईना सहभागी होता आले, हे माझे भाग्य. सातारकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

- प्रकाश शेलार

सामाजिक चळवळीत आघाडीवर

श्री. शेलार हे व्यवसायानिमित्त मुंबईत असले, तरी मातीची ओढ त्यांना कायमच खुणावत असते. त्यामुळेच सातारकरांना एकत्र घेऊन त्यांनी ‘समर्थ प्रतिष्ठान’ची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवतात. प्रतिष्ठानचे ते कार्याध्यक्ष आहेत. मीरा-भाईंदर शहरात मनसेचे पदाधिकारी म्हणूनही त्यांची ओळख आहे.