कोरेगावात आजपासून डेंगीपूर्व तपासणी मोहीम

नगरपंचायत व तालुका आरोग्य विभागाच्या वतीने २४ पथके नियुक्त
डेंगी
डेंगीsakal

कोरेगाव - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंगी आणि डेंगीसदृश रुग्ण आढळून येऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश शिंदे यांच्या सूचनेनुसार कोरेगाव नगरपंचायतीने तालुका आरोग्य विभागासह आज एक संयुक्त आणि व्यापक बैठक घेऊन उद्यापासून (ता. दहा) डेंगीपूर्व नियंत्रनार्थ उपाययोजना मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी डेंगी व डेंगीसदृश रुग्ण आढळू लागल्याचे समजताच आमदार शिंदे यांनी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, मुख्याधिकारी विजया घाडगे यांना शहर आणि परिसरात डेंगी साथ येण्यापूर्वी ती येऊ नये, यासाठी कोरेगाव तालुका आरोग्य विभागाला बरोबर घेऊन संयुक्त अशी उपाययोजना मोहीम आखण्याची सूचना केली होती.

त्याप्रमाणे आज नगरपंचायतीत नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, मुख्याधिकारी विजया घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, नगरसेवक, तालुका आरोग्य विभागाचे कर्मचारी मन्सूर मुलाणी, जितेंद्र कदम, श्री. चौगुले, श्री. जगताप, गुरव, क्षीरसागर, श्रीमती भोसले, तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. त्यामध्ये डेंगीच्या पार्श्वभूमीवर २४ संयुक्त पथके तयार करून उद्यापासून शहरात घरटी सर्व्हे, त्यामध्ये डेंगी होण्यास आणि तो पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींची उदाहरणार्थ नाले तुंबून राहणे, रिकाम्या टायरमध्ये पाणी साठून राहणे, फ्रिजच्या पाठीमागे पाणी साचून राहणे आदींची तपासणी करून आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत.

घराघरांत फोगिंग मशिनद्वारे जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या व परिसराच्या निरोगी आणि सुदृढ आरोग्यासाठी पथकांना तपासणीत सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा बर्गे, उपनगराध्यक्ष बर्गे, मुख्याधिकारी घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

दरम्यान, नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन डेंगीसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करावा, अशी सूचना केली असता ती मान्य करण्यात आली. शिष्टमंडळाने डेंगी तपासणी किट पुरवण्याची ग्वाही देत उपचारासाठी काही औषधे जरी कमी पडली तरी ती पुरवण्याची ग्वाही दिली. या वेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक महेश बर्गे, नगरसेवक राजेंद्र वैराट, अर्जुन आवटे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. दबडे उपस्थित होते.

शौचालयाच्या पाइपना जाळ्या बसवणार

नगरपंचायतीच्या वतीने डेंगीच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून (शुक्रवारी) सुरु होणाऱ्या या मोहिमेत शहरातील सर्व मिळकतधारकांच्या वैयक्तिक शौचालयांच्या वेंट पाइपला नायलॉनच्या जाळ्या मोफत बसवून देण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरून ‘डेंगी’चे डास शौचालयात पर्यायाने घरात जाण्याची शक्यता कमी होऊ शकते, असे नगराध्यक्षा बर्गे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com