शिक्षक बॅंकेचा वाजला बिगुल; शिक्षक संघ, समितीत हालचाली

२८ जूनला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
Primary Teachers Co-operative Bank Election final voter list will published on June 28 satara
Primary Teachers Co-operative Bank Election final voter list will published on June 28 sataraEsakal

सातारा : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू असून, अंतिम यादी २८ जूनला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून, ऐन पावसाळ्यात शिक्षकांच्या बॅंकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने आतापासूनच सत्ताधारी शिक्षक संघ व विरोधी शिक्षक समिती या पारंपरिक विरोधकांत हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. शिक्षक बॅंकेचे १० हजार २६७ मतदार सभासद असून, या मतदारांची कच्च्या यादीवर दाखल हरकती व आक्षेपावर सुनावणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

जिल्हा उपनिबंधक त्यावर २४ जूनला निर्णय देणार आहेत. त्यानंतर २८ जूनला अंतिम मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रसिद्ध करणार आहेत. त्यामुळे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. ऐन पावसाळ्यात शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक बॅंकेतील पारंपरिक विरोधक असलेले शिक्षक संघ व शिक्षक समिती यांच्यात आतापासूनच आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शिक्षक समितीने या वेळी कोणत्या ही परिस्थितीत सत्ता ताब्यात घेण्यासाठी तालुकानिहाय संपर्क मोहीम हाती घेतली आहे.

दुसरीकडे शिक्षक संघ एकसंध बांधणी करण्याची मोठी जबाबदारी शिक्षक नेते संभाजीराव पाटील गट, शिवाजीराव पाटील गट व सिद्धेश्वर पुस्तके गटावर आहे. नुकतीच शिक्षक संघाचे नेते मच्छिंद्र मुळीक यांनी संघाच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे संघाची शकले होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे; पण निवडणुकीच्या तोंडावर संघातील वाद विकोपाला न जाता शिक्षक संघ एकसंध ठेवण्याची जबाबदारी आता या नेते मंडळींवर आहे. त्यादृष्टीने संघाच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे शिक्षक संघाची सत्ताकाळात घेतलेल्या व्याजदरात कपात व कर्ज स्वस्त करण्याचे निर्णय या मुद्द्यांना पुढे करून सभासदांपर्यंत जाण्याची तयारी संघाने केली आहे. त्यातून त्यांना पुन्हा एकदा संघाकडे सत्ता येण्याची आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com