
पाटण ते कोयनानगरपर्यंत मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे.
Satara : कऱ्हाड-चिपळूण रुंदीकरणातील 'विघ्न' कधी संपणार? पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज
मल्हारपेठ : कऱ्हाड- चिपळूण रस्ता (Karad- Chiplun Road) रुंदीकरण झाले. मात्र, समस्यांचा ससेमिरा अद्यापही संपता संपेना, अशी गत झाली आहे. कामाचा दर्जा, नुकसान भरपाई, जोड रस्ते, पिकअप शेड, हजारो झाडांची कत्तल, पुलांची कामे, अपुरी कामे यामुळे अपघातात जीव गमावलेल्यांच्या यातना अशा सर्व समस्यांमुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामातील विघ्न संपणार कधी? असा प्रश्न पडत आहे.
पालकमंत्री या कामाकडे लक्ष देणार का? याची तालुकावासीयांना उत्सुकता आहे. गेल्या सहा वर्षांपासून केंद्रीय रस्ते दळणवळण वाहतूक विभागामार्फत मंजूर झालेल्या २८७ कोटी रुपये खर्चाच्या कऱ्हाड- हेळवाक रस्ता दर्जोन्नतीकरणाचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. यातील १२ हेक्टर बाधित जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. मात्र, नुकसान भरपाईपासून अजूनही काही शेतकरी वंचित आहेत.
कऱ्हाड- चिपळूण रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असले, तरी यातील कऱ्हाड ते पाटणपर्यंतचे (म्हावशी) काम कसेतरी पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र, यातील अडूळ, नवारस्ता, मल्हारपेठ येथील रुंदीकरणाचे काम अर्धवट स्थितीत राहिले आहे. म्होप्रेपासून म्हावशीपर्यंत असणाऱ्या गावजोड रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. पाटण ते संगमनगर धक्का या १५० कोटी रुपये खर्चाचे १३ किलोमीटरचे काम अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे पाटण, कोयना महामार्गावर अद्यापही कितीतरी वर्षे धक्के खावे लागणार, हे नक्की.
जोडरस्ते न झाल्याने मार्गालगत गावांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. साकुर्डी फाटा ते नवारस्ता मार्गावर कुठेही पिकअपशेड नसल्याने प्रवाशांना उन्ह-पावसात टपऱ्यांचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत अनेकदा आंदोलने झाली. रस्ता रोको झाला. मात्र, लवकरच या बाबी पूर्णत्वाकडे जातील, असे प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे आश्वासन मिळाले आहे. आतापर्यंतच्या कामाच्या दर्जाबाबत लोक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. मूळ ठेकेदार कंपनीने हे काम कऱ्हाड- पाटण तालुक्यांतील अनेक छोट्या ठेकेदारांना देऊन ते केल्याने कामाचा दर्जा राहिला नसल्याचे बोलले जात आहे.
म्हावशी फाटा- संगमनगर धक्का हे काम अजून मंजूर न झाल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह आहे. पाटण ते कोयनानगरपर्यंत मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे. हे काम पूर्ण व्हावे, यासाठी मंत्री देसाई यांनी मुंबईत मंत्रिमंडळ बैठक घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पुढचे काम मंजूर नसल्याचेही रस्ते दळणवळण विभागाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे पालकमंत्री देसाई यांनी गांभीर्याने पाहात हे काम मंजुरीसाठी प्रयत्न करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.
रुंदीकरणातील समस्या
काही निवाडे अपूर्ण असल्याने बाधितांना मिळेना नुकसान भरपाई
जोड रस्ते अपूर्ण
पिकअप शेड नाहीत
दिशादर्शक फलक, स्पीड ब्रेकर, झेब्रा क्रॉसिंग नाहीत
अनेक ठिकाणी मुख्य रस्ता खचलेला
तोडलेल्या झाडांच्या बदल्यात एकही झाड लावले नाही
नवारस्ता, मल्हारपेठ, अडूळ, म्हावशी फाटा येथील अपूर्ण काम लवकरच पूर्ण होईल. केरा पुलाचेही काम पूर्ण करू उर्वरित पाटण- संगमनगर हे १३ किलोमीटरचे काम अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. उर्वरित संगमनगर- धक्का ते पुढे घाटमाथा हे काम डांबरीकरणातून पूर्ण होईल. पिकअप शेडसाठी नवे प्रस्ताव मंजुरीतून अपेक्षित ठिकाणी पूर्ण होतील.
- किशोर शेजवळ, सहायक अभियंता, सातारा