माजी नौसेना अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा साताऱ्यात तीव्र निषेध

उमेश बांबरे
Wednesday, 16 September 2020

सर्वाधिक धोका सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना आहे. समाजकंटक अशा कुटुंबांवर अन्याय, अत्याचार करत आहेत. सध्या भारतीय हद्दीत चीन व पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर सीमेवर कोरोनाच्या संकटातही सैनिक ठामपणे उभे आहेत. राज्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिक संघटना या सैनिकांच्या पाठीशी आहेत.

सातारा : सेवानिवृत्त नौसेना अधिकारी मदन शर्मा यांना मुंबईत झालेल्या मारहाणीचा जिल्ह्यातील माजी सैनिक व विविध माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी यांनी निषेध नोंदविला. तसेच या घटनेस जबाबदार संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

माजी सैनिक संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, माजी नौसेना अधिकारी मदन शर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून, या घटनेने सर्व माजी सैनिक संतप्त झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेऊन संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करावी. महाराष्ट्रात कार्यरत सैनिकांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ले आणि अन्यायाच्या घटना वाढत आहेत. नगर येथे सैनिक मनोज अवटींचा क्रुरपणे खून झाला. तर एकता कपूरने सैनिकांच्या पत्नींचे चारित्र्यहनन केले. असे अनेक प्रकार राज्यात घडत आहेत. 

ग्राहकाला हसवतोय अन् शेतकऱ्याला रडवतोय कांदा!

सर्वाधिक धोका सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना आहे. समाजकंटक अशा कुटुंबांवर अन्याय, अत्याचार करत आहेत. सध्या भारतीय हद्दीत चीन व पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर सीमेवर कोरोनाच्या संकटातही सैनिक ठामपणे उभे आहेत. राज्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिक संघटना या सैनिकांच्या पाठीशी आहेत. गरज पडल्यास आम्ही प्रत्यक्ष सीमेवर मदतकार्य करण्यासाठी जाण्यासही सज्ज आहोत. त्यामुळे आमच्या मागणीचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर माजी सैनिक व पालिकेचे माजी उपाध्यक्ष शंकर माळवदे, माजी नौसैनिक ऍड. वसंतराव नलावडे, माजी नौसैनिक सूर्यकांत पडवळ, माजी वायुसैनिक विनित पाटील यांच्या सह्या आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protest Against Beating Of Retired Naval Officers Satara News