
Express Railway : दर मंगळवारी धावणार पुणे-मिरज-पुणे एक्स्प्रेस; गाडीला असणार पाच थांबे
रेठरे बुद्रुक - पुणे-मिरज लोहमार्गावर येत्या सहा जूनपासून दर मंगळवारी पुणे-मिरज-पुणे एक्स्प्रेस ही गाडी सुरू होणार आहे. या गाडीला पुणे ते मिरजपर्यंत पाच थांबे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना या गाडीमुळे फायदा होणार आहे. गाडी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी होती. त्याची दखल घेत मध्य रेल्वे जून महिन्यापासून ही गाडी सेवेत दाखल करत आहे.
सद्या लोहमार्ग दुहेरीकरण व विद्युतीकरण काम सुरू आहे. या मार्गावरील लोकल व एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांचा सुलभ प्रवास होत आहे. मध्य रेल्वेने दर मंगळवारी पुणे-मिरज-पुणे एक्स्प्रेस सुरू केली आहे. सहा जूनपासून ती सेवेत दाखल होणार आहे. ही गाडी पुणे येथून सकाळी आठ वाजता सुटेल. दुपारी पावणेदोन वाजता मिरज येथे पोहोचेल. तेथून सव्वादोन वाजता सुटणारी गाडी रात्री पावणेआठ वाजता पुणे येथे पोचेल. या गाडीला जेजुरी, लोणंद, सातारा, कऱ्हाड व सांगली हे पाच थांबे आहेत. या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांची सोय झाली आहे.
असा असेल वेळापत्रक
पुणे-मिरज : (०१४२३) सकाळी आठ वाजता पुण्याहून सुटेल. ८.५३/८.५५ जेजुरी, ९.३३/९.३५ लोणंद, १०.३२/१०.३५ सातारा, ११.२७/११.३० कऱ्हाड, १२.१७/१२.३० सांगली, दुपारी १.४५ वाजता मिरज येथे पोचेल.
मिरज- पुणे : (०१४२४) दुपारी २.२५ वाजता मिरज येथून सुटेल. २.३७/२.४० सांगली, ३.२८/३.३० कऱ्हाड, ४.२७/४.३० सातारा, ५.२८/५.३० लोणंद, ६.०५/६.०७ जेजुरी व रात्री ७.४० वाजता पुणे येथे पोहचेल.