
Satara News : रायगडच्या स्वराज्य वापसीला अडीचशे वर्षे
कोरेगाव : स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड सरदार अप्पाजी हरींच्या नेतृत्वाखाली १८ मार्च १७७३ रोजी तिसऱ्यांदा स्वराज्यात आला. या मोहिमेत कोरेगावचे समशेरबहाद्दर खंडेराव बर्गे, त्यांचे सहकारी आणि इतर सरदारांनी मोलाची कामगिरी बजावल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. या ऐतिहासिक अशा कामगिरीला उद्या (शनिवारी) अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत.
किल्ले रायगड ही स्वराज्याची राजधानी. रायगडचे मूळ नाव रायरी. चंद्रराव मोरे यांच्याकडून मे १६५६ मध्ये हा किल्ला शिवाजीराजे यांच्या ताब्यात आला. छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानानंतर तीन नोव्हेंबर १६८९ मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.
छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या आदेशाने हा किल्ला पाच जून १७३३ मध्ये पुन्हा स्वराज्यात सामील झाला. त्यांच्या मृत्यूनंतर किल्ले रायगडचा हवालदार पोतनीस मराठ्यांच्या विरुद्ध उठला, तेव्हा शाहू महाराजांचे वारसदार रामराजा यांनी ३० ऑगस्ट १७७२ मध्ये रायगड पेशव्यांच्या ताब्यात देण्याची आज्ञा केली.
मात्र, त्याने आज्ञा पाळली नाही. त्यानंतर थोरले माधवराव पेशव्यांनी किल्ले रायगड पुन्हा ताब्यामध्ये घेण्यासाठी सुरू केलेली मोहीम नारायणराव पेशवे यांनी सरदार अप्पाजी हरी यांचे नेतृत्वात १८ मार्च १७७३ मध्ये पूर्ण केली आणि स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड तिसऱ्या वेळी स्वराज्यात आला.
त्यावेळी अप्पाजी हरींनी खंडेराव बर्गे यांच्यासह सर्व सरदारांना बरोबर घेऊन महाराजांच्या तख्तास मुजरा करून नक्त पाच रुपये सिंहासनापुढे ठेवले. रुप्याची फुले सिंहासनावर उधळली. तख्तास पागोट्याची झालर लावली होती.
अप्पाजी हरींनी तेथेच दरबार भरविला आणि रायगडाची पुढील संपूर्ण व्यवस्था लावून दिली. सर्व सरदारांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या ऐतिहासिक मोहिमेचे आणि ऐतिहासिक अशा दिवसाचे साक्षीदार समशेरबहाद्दर खंडेराव बर्गे एक होत. ही घटना बर्गे घराण्यासाठी सन्मानाची व अभिमानास्पद गोष्ट आहे, असे येथील इतिहास संशोधक पांडुरंग सुतार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
रायगडावर आज शौर्य, अभिमान दिवस
किल्ले रायगड स्वराज्यामध्ये तिसऱ्या वेळी आलेल्याला उद्या (शनिवार) अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक मोहिमेत कोरेगावचे समशेरबहाद्दर खंडेराव बर्गे आणि त्यांच्या लोकांनी इतर सरदारांसह मोलाची कामगिरी बजावल्याच्या पार्श्वभूमीवर बर्गे घराण्याने यंदापासून १८ मार्च हा दिवस ‘समशेरबहाद्दर खंडेराव बर्गे पराक्रम, शौर्य आणि अभिमान दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
यानिमित्ताने दर वर्षी या दिवशी बर्गे घराण्यातील लहान- थोर स्वयंस्फूर्तीने रायगडावर जाऊन तेथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दर्शन, किल्ले रायगड पूजन, छत्रपती शिवाजी महाराज, खंडेराव बर्गे यांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांच्या शौर्याची परंपरा आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्षात आणण्याची शपथ घेतील, असे बर्गे मंडळींनी सांगितले.