Rajesh Kshirsagar : सातारा लोकसभेसाठी सक्षम उमेदवार देऊ; राजेश क्षीरसागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Kshirsagar statement Provide competent candidate for Satara Lok Sabha politics

Rajesh Kshirsagar : सातारा लोकसभेसाठी सक्षम उमेदवार देऊ; राजेश क्षीरसागर

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम होती घेतले असून, त्यानुसार पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येत आहेत.

जिल्ह्यात शिवसेनेला चांगले वातावरण असून, आगामी काळात सातारा शिवसेनेचा जिल्हा होऊ शकतो. जागा वाटपचा निर्णय झाल्यानंतर शिवसेना सातारा लोकसभेसाठी सक्षम उमेदवार देईल, असा विश्वास शिवसेनेचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने धनुष्यबाण यात्रा काढली जाणार आहे, त्या वेळी जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा होईल, असे त्यांनी सांगितले.

श्री. क्षीरसागर आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी नियोजन समितीचा आढावा घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, पुरुषोत्तम जाधव, जयवंत शेलार उपस्थित होते.

राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यभर शिवसेनेने पक्ष बांधणीचे काम हाती घेतले असून, माझ्याकडे सातारा लोकसभेची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात शिवसेनेची भक्कम बांधणी असून, यापूर्वी जावळीतून सदाभाऊ सपकाळ हे आमदार, तसेच हिंदूराव नाईक निंबाळकर शिवसेनेचे खासदार झाले होते.

त्यांच्यानंतर आता शंभूराज देसाई व महेश शिंदे हे दोन आमदार जिल्ह्यात आहेत. त्यामुळे संघटना बांधणी चांगल्या पद्धतीने होणार आहे. आगामी काळात हा शिवसेनेचा जिल्हा होऊ शकतो. मागील महिन्यात जिल्ह्यातून शिवसेनेत इनकमिंग झाले आहे.

अर्थसंकल्पातही साताऱ्याला झुकते माप मिळाले आहे. सध्या जनता शिवसेनेच्या पाठीशी असून, आगामी काळात शिवसेना व भाजप एकत्र काम करणार आहे. लोकसभेला उमेदवारी कोणाला द्यायची हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील.

माझे काम संघटना बांधणीचे असून, उमेदवार ठरविण्याचे नाही, असे सांगत त्यांनी देसाईंना उमेदवारी दिली जाणार का? या प्रश्नावर बोलणे टाळले.’’ जिल्हा नियोजन समितीचा शंभर कोटींचा निधी अखर्चिक असून, तो लवकरच खर्च होईल, आता कुठे गाडी रुळावर यायला लागली असल्याचेही ते म्हणाले.

आगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी वक्तव्य केले आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘सध्यातरी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असून, आगामी मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांनाच पाहात आहोत. पुढचे पुढे पाहू, याबाबत भाजपकडून कोणताही दगाफटका होणार नाही.’’

बानुगडेची गरज नाही...

आगामी काळात नितीन बानुगडे पाटील यांना शिवसेनेत घेतले जाणार का, या प्रश्नावर राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘व्याख्याने देऊन पक्ष वाढत नाही. जिल्ह्याला बानुगडे यांच्या व्याख्यानाची गरज नाही. कारण आज आमच्याकडे अनेक शिलेदार आहेत.’’

टॅग्स :SataraLok Sabha