जिद्द अंध भावंडांची; मनगटातील हिमतीने भेदला जीवनातील अंधार

राजेश पाटील | Wednesday, 25 November 2020

दुर्गम भागात किराणा दुकान असल्याने जुजबी कमाई होते. एखाद्या शहरातील मोठ्या बस स्थानकात टपरीवजा दुकानासाठी परवानगी व आवश्‍यक सहकार्य मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले; परंतु पदरी निराशाच आली असे भरत कदम यांनी नमूद केले.

ढेबेवाडी (जि. सातारा) : निगडे (ता. पाटण) या दुर्गम गावातील जन्मतः अंध असलेले दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या आधाराने चक्क किराणा दुकान चालवत कुटुंबाला हातभार देत आहेत. अशोक व भरत लक्ष्मण कदम अशी या जिद्दी भावंडांची नावे असून, खडतर परिस्थितीशी जिद्दीने दोन हात करत त्यांनी भेदलेला अंधार सतत अडचणींचा पाढा वाचणाऱ्या धडधाकट डोळसांच्या डोक्‍यात लख्ख प्रकाश टाकणारा आहे.
 
सह्याद्री व्याघ्र राखीवच्या बफर झोनमध्ये समाविष्ट निगडेत अशोक व भरत ही अंध भावंडे वृद्ध आई-वडिलांसमवेत राहतात. वडील लक्ष्मण पूर्वी मुंबईत माथाडी कामगार होते. लहानपणी एकापाठोपाठ एक अशा दोन्ही मुलांचे अंधत्व लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंबईसह विविध ठिकाणच्या दवाखान्यांतून उपचारासाठी त्यांना फिरवले. उन्हातान्हात ओझी वाहून जमवलेली पुंजी त्यासाठी खर्च केली. मात्र, डॉक्‍टरांनीही हात टेकल्याने अखेर वास्तव स्वीकारावेच लागले. सध्या अशोकचे वय 38 असून, भरत तिशीत आहे. त्यांना एक विवाहित बहीण व भाऊ असून, भाऊ कऱ्हाडला रिक्षा चालवितो. जंगलाच्या कुशीत वसलेले गाव आणि लहानपणापासूनच आलेले अंधत्व यामुळे अशोक व भरतला शिक्षण घेणे शक्‍य झाले नाही. मात्र, अंधकारमय जीवनात आलेले अनेक अनुभव त्यांना खूप काही शिकवत जगण्याची हिंमत वाढवत गेले. सुमारे 15 वर्षांपूर्वी त्यांनी घरात छोटेसे किराणा दुकान सुरू केले. सुरुवातीला वडील त्यांच्यासोबत दुकानात थांबून मदत करत होते. मात्र, पुढे दोघांनीही ग्राहकाने मागितलेली वस्तू अचूक शोधून आणि वजन करून देण्याबरोबरच व्यवहार ज्ञानही आत्मसात करत दुकानाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. दुकानाच्या दर्शनी बाजूला सुरक्षेसाठी संपूर्ण लोखंडी जाळी बसवली असून, ग्राहकांना साहित्य देऊन पैसे घेण्यासाठी छोटी खिडकी केली आहे. सकाळी नऊपासून रात्रीपर्यंत कदम बंधूंचे दुकान सुरू असते. दिवसभरात अडीचशे-तीनशे रुपये धंदा होतो. दिवसाकाठी साठ-सत्तर रुपये मिळतात,' असे दोघांनी सांगितले.

ते म्हणाले, ""खर्चाचा मेळ घालत कसरत करत पण हिमतीने जगणे सुरू आहे.' ढेबेवाडीतील होलसेल दुकानातून ते माल खरेदी करतात. गावात जोडलेली माणसे व वडापवाले ढेबेवाडीत गेल्यावर दिलेल्या चिठ्ठीप्रमाणे माल खरेदी करून आणतात. "भरत यांना तबला वाजविण्याची आवड आहे. संगीत शिक्षक सुनील राजे यांनी त्यांना ही कला शिकवली आहे. मध्यंतरी त्यांनी ढेबेवाडी बाजारपेठेतही नवीन किराणा दुकान सुरू केले होते; पण अडचणीमुळे बंद करावे लागले. दोघेही भाऊ स्वतःची दैनंदिन कामे स्वतः करतात. सार्वजनिक नळावरून घागरीने पाणी भरतात, जनावरांच्या गोठ्यातील शेण काढतात. एवढच नाही तर अंदाजाने मोबाईल नंबर डाईल करतात आणि वाहनांच्या आवाजावरून गावातील ओळखीचे कोण आलंय हे सुद्धा ओळखतात. स्पर्शज्ञानाने नोटा ओळखून शिल्लक पैसे ग्राहकांना देण्याचे ज्ञानही त्यांना अवगत आहे. 

काटा मारणाऱ्या उमेदवारांचा पदवीधर काटा काढतील : डॉ. श्रीमंत कोकाटे

Advertising
Advertising

""दुर्गम भागात किराणा दुकान असल्याने जुजबी कमाई होते. एखाद्या शहरातील मोठ्या बस स्थानकात टपरीवजा दुकानासाठी परवानगी व आवश्‍यक सहकार्य मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले; परंतु पदरी निराशाच आली.'' 
- भरत कदम

Edited By : Siddharth Latkar