पेरले की कित्येक पटीने उगवते हे साताऱ्याच्या मातीने शिकवले : संजय राऊत
संजय राऊत हे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकाऱ्याबरोबरच अनेक छंद जोपासत होते. क्रिकेट, टेबल टेनिस, मॅरेथॉन याबरोबरच विविध प्रकारच्या गाण्यांचेही ते निस्सीम चाहते होते. याची झलक त्यांनी आपल्या मनोगतातही दिली.
सातारा : चांगल्या कामाची समाज दखल घेतो. पेरले की कित्येक पटीने उगवते हे प्रचंड प्रेम देत साताऱ्याच्या मातीने मला शिकवले, अशा भावना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सेवानिवृत्ती समारंभात व्यक्त केल्या. एमएच 11 आता हॉर्न विसरा या प्रदूषण नियंत्रणात महत्त्वाच्या ठरणाऱ्या मोहिमेचा प्रणेता व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राऊत यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित समारंभात त्यांनी सेवा केलेल्या प्रत्येक जिल्ह्यातील माणूस गहिवरून येत होता. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अत्यंत भारवलेल्या वातावरणात अनेकांनी त्यांना भावी वाटलाचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. राऊत यांचा साताऱ्याशी एक वेगळाचा ऋणानुबंध जुळला होता. 1983 च्या बॅचला श्री. राऊत राज्यात प्रथम आले होते. 2003 ते 2004 या काळात त्यांनी पहिल्यांदा साताऱ्यात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम पहिले. तेव्हापासून त्यांचे साताऱ्याशी नाते जुळले. त्यानंतर त्यांनी 2013 ते 2016 ही तीन वर्षे साताऱ्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम पहिले. आपल्या दोन्ही कारकिर्दीत त्यांनी साताऱ्यातील सर्वसामान्यांपासून ते विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या व्यक्तींशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले. या काळातच ते साताऱ्याच्या प्रेमात पडले. त्यामुळे मूळचे माळीनगर (जि. सोलापूर) येथील असतानाही त्यांनी आपल्या निवृत्तीची शेवटची वर्षे साताऱ्यातच काम करण्याची संधी घेतली. जून 2019 पासून 31 ऑक्टोबरअखेर ते साताऱ्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहेत. यापूर्वी काम केलेल्या ठिकाणच्या मित्रांच्या आग्रहामुळे त्यांना त्याठिकाणी आगामी दोन दिवसांत कार्यक्रमासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
लडाखाच्या दरीत जवानाचा मृत्यू; परळी खाे-यात हळहळ
या वेळी डॉ. संजोग कदम, डॉ. विकास पाटील, डॉ. भास्कर यादव, ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी प्रकाश गवळी, तसेच राज्यातील विविध भागांतील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, तसेच निवृत्त झालेले सहकारी, नागरिक, राज्यातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांच्या अधिन राहून उपप्रादेशक परिवहन कार्यालयातच हा कार्यक्रम झाला. या वेळी झालेल्या मनोगतात प्रत्येकाने श्री. राऊत यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, प्रत्येकाच्या अडचणीत त्याला मदत करण्याचा स्वभाव याला उजाळा दिला. प्रत्येकाची काळजी घेणारा ट्रू लिडर, माणसं आपलीशी करणारा दृष्टा, उत्कृष्ट प्रशासक, अजातशत्रू, साताऱ्यातील आरटीओवाला बाबा, नो हॉर्नच्या माध्यमातून प्रदूषण रोखण्याची वेगळीच भूमिका मांडणार क्रांतिकारक अशा अनेक उपाध्या देत मान्यवरांनी श्री. राऊत यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला. या वेळी अनेकांना अश्रू अनावर होत होते.
इतनी खुशी आज तक नही मिली...
संजय राऊत हे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकाऱ्याबरोबरच अनेक छंद जोपासत होते. क्रिकेट, टेबल टेनिस, मॅरेथॉन याबरोबरच विविध प्रकारच्या गाण्यांचेही ते निस्सीम चाहते होते. याची झलक त्यांनी आपल्या मनोगतातही दिली. आजस पहिले.. आजसे जादा.. खुशीया आज तक नही मिली हे गाने सादर करत त्यांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातूनच आपल्या भावना प्रकट केल्या.
Edited By : Siddharth Latkar