भात उत्पादकांना विमा कंपनीकडून ठेंगा!

अमोल जाधव
Saturday, 24 October 2020

रेठरे बुद्रुक परिसरात आठवडाभर झालेल्या पावसाने भात, सोयाबीन व भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याअगोदर भात पिकावर हॉपर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही शेतकऱ्यांच्या हाती आलेले सर्व पीक वाया गेले. तपकिरी तुडतुड्यांनी भाताच्या खोडामधील रस शोषल्यामुळे पीक सुकून गेले आहे.

रेठरे बुद्रुक (जि. सातारा) : परिसरात भात पिकाचे "हॉपर'च्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीकविम्याचे संरक्षण घेतले आहे. मात्र, ही आपत्ती नैसर्गिक नसल्याचे कारण सांगून विमा कंपनीचे अधिकारी या नुकसानीची भरपाई देण्यास नकार देत असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. कृषी विभागाने यात पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. 

आठवडाभर झालेल्या पावसाने भात, सोयाबीन व भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याअगोदर भात पिकावर हॉपर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही शेतकऱ्यांच्या हाती आलेले सर्व पीक वाया गेले. तपकिरी तुडतुड्यांनी भाताच्या खोडामधील रस शोषल्यामुळे पीक सुकून गेले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव बघितल्यास डोळ्यात पाणी येते. अशा स्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी या पिकासाठी पीकविमा घेतला आहे, त्यांनी नुकसानभरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. नुकसानग्रस्त पिकाची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणीसुद्धा केली आहे. अधिकाऱ्यांच्या प्रक्षेत्र भेटीची नोंद घेऊन भरपाईसाठी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली असता शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळणार नाही, असे सांगितले जात आहे. पीकविमा घेऊनही भरपाई मिळत नसल्याने या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीची उदासिनता निर्माण झाली आहे, हे नक्की. 

शिधापत्रिका परत करण्यास सुरवात; आजी-माजी सैनिकांकडून रेशनकार्ड जमा

...हा घ्या पुरावा, चोराच्या उलट्या बोंबा 

हॉपरचा प्रादुर्भाव ही नैसर्गिक आपत्ती नाही, असे अधिकारी सांगत असले, तरी विमा संरक्षणाच्या निकष यादीत पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट या बाबतीत संरक्षण देण्याचे ठळकपणे नमूद केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice Growers Are Not Relieved By The Insurance Company Satara News