कोरोनाबाधित 132 महिलांची प्रसूती सुरक्षित; डॉक्‍टर-परिचारिका ठरले 'देवदूत'

प्रवीण जाधव | Saturday, 24 October 2020

मार्च महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीला सुरवात झाली. एक-दोन रुग्ण सापडण्यापासून झालेली सुरवात हजाराच्या घरात कधी गेली, हे अनेकांना समजले नाही. या कालावधीत अनेक ठिकाणी माणसातील माणसुकी हरविल्याचे चित्र दिसत होते. कोरोना महामारीपासून होणाऱ्या त्रासाचा व घ्यावयाच्या काळजीचा भडीमार सातत्याने मेंदूवर आघात करत असल्यामुळे एकमेकांबरोबर बसण्यापासून ते बोलण्यापर्यंतही अनेकांनी दुरावा साधला होता. प्रत्येक जण आपल्या जिवाची काळजी करताना दिसत होता.

सातारा : कोरोनाचा प्रतापच असा होता की प्रत्येक जण मरणाला भीत होता... सामान्यच काय ज्यांनी रुग्णांची काळजी घेण्याचे व्रत स्वीकारले आहे, असे काही डॉक्‍टरही रुग्णांना दूर लोटत होते. अशा भीषण महामारीची तमा न बाळगता व्रताशी प्रामाणिक राहणारे डॉक्‍टर समाजाचे भूषण ठरले नाहीत तरच नवल. या कसोटीवर जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागातील डॉक्‍टर आणि परिचारिका पुरेपूर कर्तव्यपूर्तीत उतरल्या आहेत. कोरोनाच्या तीव्र प्रादुर्भावाच्या काळात त्यांनी 132 कोरोनाबाधित महिलांची सुरक्षित प्रसूती करत त्यांचे मातृत्व सुसह्य केले आहे. या मातांसाठी ते देवदूतच ठरले आहेत. 

मार्च महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीला सुरवात झाली. एक-दोन रुग्ण सापडण्यापासून झालेली सुरवात हजाराच्या घरात कधी गेली, हे अनेकांना समजले नाही. या कालावधीत अनेक ठिकाणी माणसातील माणसुकी हरविल्याचे चित्र दिसत होते. कोरोना महामारीपासून होणाऱ्या त्रासाचा व घ्यावयाच्या काळजीचा भडीमार सातत्याने मेंदूवर आघात करत असल्यामुळे एकमेकांबरोबर बसण्यापासून ते बोलण्यापर्यंतही अनेकांनी दुरावा साधला होता. प्रत्येक जण आपल्या जिवाची काळजी करताना दिसत होता. कोणत्याही परिस्थिती रुग्णसेवा करण्याचे व्रत घेतलेले अनेक वैद्यकीय अधिकारीही या आजारापासून दूर राहिले नव्हते. अनेकांनी रुग्ण तपासणीही बंद केली होती. एरवी शस्त्रक्रियांसाठी नेहमी तत्पर असलेले खासगी दवाखानेही हात आखडता घेत होते. त्यामुळे विशेषत: शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांची परवड होत होती. त्यामध्येही सर्वांत जास्त अडचण झाली होती, ती गर्भवती स्त्रियांची. 

साहेब, माझा कुणावरच भरवसा न्हाय.. आता मी काय करू;  हताश माउलीची दरेकरांना साद

प्रसूती कालावधीपर्यंतचा त्रास आधीच महिलांना खूप सोसावा लागतो. त्यामध्ये शारीरिक व मानसिक स्थिती सांभाळताना त्यांची मोठी कसरत होते. त्यातच मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना वारे घोंघावू लागले. त्यामुळे आधीपासून नोंदणी असलेल्या ठिकाणीही प्रसूती होईल का नाही, अशी चिंता गर्भवती महिला व त्यांच्या नातेवाईकांसमोर होती. कोरोनाची बाधा होण्याच्या भीतीबरोबर हे मोठे संकट अशा कुटुंबांसमोर होते. अशा परिस्थितीत कोरोनाची बाधा झाली तर मग बोलायलाच नको. खासगी रुग्णालयांमध्ये अशा महिलांच्या प्रसूतीसाठी बहुतांश ठिकाणी नकारच होता. एखाद्या ठिकाणी व्यवस्था झाली तर, त्यासाठी लाखो रुपये मोजायची तयारी गर्भवतीच्या कुटुंबाला ठेवावी लागत होती. या परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी गर्भवती महिलांसाठी गेल्या महिन्यापासून देवदूत ठरत आहेत.

कास - बामणोली रस्त्यावरील पूलाचे काम लवकरच : उदयनराजे  

कोरोनाच्या भीतीमुळे मार्च महिन्यापासून जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे कामाचा ताण वाढला होता. त्यातच गर्भवती महिलाही कोरोनाबाधित होऊ लागल्या. अशांच्या प्रसूतीचा प्रश्‍न होता. परंतु, मार्चपासून जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या एकाही कोरानाबाधित गर्भवती महिलेचा प्रवेश नाकारला गेला नाही. जिल्हा रुग्णालयात यासाठी स्वतंत्र शस्त्रक्रिया गृह, प्रसूती कक्ष, स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या महिलांवर उत्तम प्रकारे उपचार करण्यात आले. सिझर असो किंवा नॉर्मल शस्त्रक्रिया कोरोनाचे कोणतेही दडपण न बाळगता येथील टीम काम करत होती. आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 132 यशस्वी प्रसूती शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामध्ये 76 नॉर्मल तर, 56 सिझर करण्यात आले आहे. ऑक्‍सिजन पातळी 40 ते 50 पर्यंत असलेल्या महिलांनाही अतिदक्षता विभागात उत्तम उपचार देत त्यांनी बरे केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या कुटुंबांत हास्य पसरविण्यात हे पथक यशस्वी ठरले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभाग निश्‍चितच कौतुकास पात्र ठरला आहे. 

CoronaUpdate : सातारा तालुक्यात वाढताेय काेराेनाचा संसर्ग

...हे आहेत प्रसूती विभागातील कोरोनायोद्धे 

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती विभागप्रमुख डॉ. सुनील सोनावणे, डॉ. एस. पी. देसाई, डॉ. सुधीर कदम, डॉ. अतुल लिपारे, डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. अनिल राठोड व डॉ. प्रेषिता पचारिया या वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम कोरोनाबाधितांच्या प्रसूतीसाठी झटत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर परिचारिकांचेही यामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या एकत्रित कार्यामुळेच कोरोनाबाधित गर्भवतींचे मातृत्व सुसह्य झाले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे