"रमाई घरकुला'साठी निधीची परवड

goverment
goverment

कऱ्हाड (जि. सातारा) ः रमाई घरकुल आवास योजनेसाठी निधी उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी चिंतेत आहेत. पावसाळा तोंडावर आला असून अद्याप योजनेतील अनेक कामे अर्धवट तर काही कामे सुरूही न झाल्याने लाभार्थ्यांपुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 2019-20 मध्ये जिल्ह्यात एक हजार 700 घरकुले मंजूर असून त्यांनाही निधी मिळत नसल्याने लाभार्थ्यांत नाराजी आहे. 

अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी रमाई घरकुल योजना राबवली जाते. समाजकल्याण विभागाकडून योजनेसाठी आराखडा तयार केला जातो. त्यातील पात्र लाभार्थ्यांना एक लाख 20 हजारांचा निधी दिला जातो. "नरेगा'मधून 20 हजारांचा हातभार लावला जातो. पाच टप्प्यात हा निधी दिला जातो. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून या योजनेचे नियंत्रण होते. मात्र, 2016 पासून 2018 पर्यंतच्या मंजूर अनेक लाभार्थ्यांना हप्तेच मिळाले नसल्याचे चित्र आहे. 2019-20 मध्येही जिल्ह्यात या योजनेत एक हजार 700 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. त्यात कऱ्हाड तालुक्‍यातील सुमारे 300 लाभार्थ्यांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांना निधीच मिळत नसल्याने घरकुल पूर्णत्वास न्यायचे कसे? असा त्यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. त्यातील अनेक घरकुलांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. काही कामे सुरूही झालेली नाहीत. पावसाळा तोंडावर आल्याने अर्धवट राहिलेल्या घरकुलांचे काम पूर्णत्वास नेण्याची लगबग असणाऱ्या लाभार्थ्यांना निधीअभावी कामच करता येत नाही. त्यातूनही काहींनी नातेवाईक, मित्रमंडळींकडून उसनवारी करून रकमेची जुळवाजुळव करून काम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, निधी केव्हापर्यंत मिळेल, याची शाश्‍वती नसल्याने लाभार्थी चिंतेत आहेत. शासनाने योजनेसाठी तातडीने निधी उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. 


रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना ऑनलाइन निधी दिला जातो. त्यासाठी राज्याचे एकच खाते असून मध्यंतरीच्या काळात 20 कोटी आले होते. त्यातून बिले केली होती. त्यानंतर राज्याच्या खात्यात रक्कम पडलेली नाही. 

- अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com