esakal | कोयना जलाशयातील अडल्या-नडलेल्यांचा देवदूत!
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

दुर्गम अशा तापोळा परिसरातील नदीच्या अलीकडे-पलीकडे जाण्याच्या सर्व सोयी पूर्णतः बंद होतात. अशा अवघड परिस्थितीत आपल्या लाकडी होडीतून दोन्ही हातांनी वल्ही मारत गाढवलीचे माने लोकांना अथक सेवा देत असतात.

कोयना जलाशयातील अडल्या-नडलेल्यांचा देवदूत!

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (जि. सातारा) : मुसळधार पाऊस असो किंवा वादळी वारे लोकांच्या सुरक्षेची काळजी घेत हा अवलिया लाकडी होडीतून दोन्ही हातांनी वल्ही मारत निरंतर लोकांना कोयनेच्या जलाशयामध्ये आपल्या मार्गावर पोचवण्याचे काम करतो आहे. कोणी आजारी पडले, कोणाला सर्पदंश झाला तर दुर्गम अशा कांदाटी खोऱ्यातील जनतेसाठी रात्री-अपरात्री कोयना जलाशय पार करून उपचारासाठी हाताने नाव वल्हवत तापोळ्यात पोचवणारा कोण असेल तर ते गाढवलीचे सुरेश मानेच. आपत्कालीन परिस्थितीत व कोरोनाच्या लढाईत अडल्या-नडलेल्यांसाठी आणि प्रशासनासाठी श्री. माने देवदूत ठरत आहेत. 


मार्च महिन्यापासून कोयनेतील पाणीपातळी निचांकीस्तरावर जाते. यांत्रिक बोटी व अवजड तराफा या पाण्यात चालू शकत नाहीत. दुर्गम अशा तापोळा परिसरातील नदीच्या अलीकडे-पलीकडे जाण्याच्या सर्व सोयी पूर्णतः बंद होतात. अशा अवघड परिस्थितीत आपल्या लाकडी होडीतून दोन्ही हातांनी वल्ही मारत गाढवलीचे माने लोकांना अथक सेवा देत असतात. मार्चपासून कोरोनाचा उपद्रव सुरू झाला. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकारने संचारबंदी जाहीर केली. संचारबंदीमुळे दोन महिने वाहने, दुकाने बंद होती. आता कुठे अनलॉक प्रक्रियेमध्ये बाजारपेठ सुरू होत आहे.

कोयनेच्या शिवसागरातील बोटी, लॉंचही मार्चपासून बंद आहेत. पलीकडे असलेल्या दुर्गम कांदाटी खोऱ्यामधील जनतेला काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर मोठी अडचण होत आहे. तसेच जावळी तालुक्‍यातील वाकी, केळघर, सोळशी, आपटी, तेटली, निपाणी या गावांसह परिसरातील लोकांना तापोळा या बाजारपेठेच्या गावी यावे लागते. या सर्वांना तापोळ्याला आणून परत सोडण्याचे काम माने करतात. कांदाटी खोऱ्यातील 16 गावे आणि बारा मुऱ्यांतील जनतेला आजही हा सुरेश अक्षरशः देवदूतच वाटतो. प्रशासनातील अधिकारी, पोलिस तसेच तापोळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारे कर्मचारी आठवड्याच्या सुटीत साताऱ्याकडे गेल्यावर त्यांनाही नेण्या-आणण्याची कसरत माने करतात.

तापोळा परिसरात वाहनांची ने-आण करण्यासाठी असणारा जिल्हा परिषदेचा तराफा बंद असल्यानंतर काही अपवादात्मक परिस्थितीत दुचाकीही आपल्या होडीत घालून माने नदीपार करतात. या सेवेसाठी मेहनताना म्हणून पैसे घेताना माने देईल तेवढे पैसे घेतात. एवढेच पाहिजेत, तेवढेच पाहिजेत असे कधीच म्हणत नाहीत. एखाद्याने नाही दिले तरी सुरेश काहीच म्हणत नाही, की कधी आडमुठेपणा नाही. हातातलं काम टाकून सुरेश लोकांची मदत करत आहे. पैसे मिळतात म्हणून तापोळ्यात विनाकारण फेरफटका मारायला जाणाऱ्यांना सुरेश अजिबात सोडत नाही. 


""पाणीपातळी घटल्यावर लॉंच व इतर इंजिनवरच्या बोटी चालत नसल्याने जुन्या होडीशिवाय पर्याय नसतो. नदीपलीकडे अनेक गावे असून, लोकांना तापोळा बाजारपेठेत व उपचारासाठी यावेच लागते. त्यामुळे लोकांच्या सेवेसाठी हे अवघड काम मिळेल तेवढ्या पैशात आनंदाने करत आहे.'' 
-सुरेश माने, होडीचालक, गाढवली 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

loading image