कचरा डेपोच्या थीम पार्कात "झिरो किलोमीटर'

कऱ्हाड ः पालिकेने उभे केलेले झिरो किलोमीटर कऱ्हाडचे शिल्प.
कऱ्हाड ः पालिकेने उभे केलेले झिरो किलोमीटर कऱ्हाडचे शिल्प.

कऱ्हाड, (जि. सातारा) : वास्तविक कचऱ्याचा डेपोचा भाग म्हणजे बारा डबरी परिसर. तो नाक मुरडून जाण्याचा रस्ता अशी ओळख होती. मात्र तेथे उभारलेल्या शिल्पासह तेथे साकारल्या जाणाऱ्या थीम पार्कमुळे तेथील ओळख बदलली आहे. 

मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्या कल्पनेतून शिल्प साकारले आहे. त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची ओळख आता पुसली जाणार आहे. तेथे झीरो किलोमीटर कऱ्हाड असे भव्य शिल्प पालिकेने उभे केल्याने थीम पार्कसह तेथील बागेला नवी ओळख मिळाली आहे. स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक पटकविणाऱ्या पालिकेने शहरात स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे चाळीस वर्षांपासून एकाच जागी साचलेला कचरा हटविणे. कचरा हटविण्याचे आव्हान स्वीकारलेल्या पालिकेला त्यात यश आले आहे.

शेकडो टनाचा कचरा हटवून पालिका तेथे सुमारे पन्नास लाखांची थीम पार्क साकारत आहे. तेथेच हे शिल्प उभे करून त्या भागाला नवी ओळख दिली आहे. कचरा डंपिंगच्या सहा एकरांतील सुमारे पाच एकर जागा पालिकेस मोकळी उपलब्ध आहे. त्यात थीम पार्क साकारले जात आहे. तो मोकळा भाग बागेत रूपांतरित करण्याच्या दृष्टीने आता महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. येथील थीम पार्कमध्ये संगीतमय कारंजे, धबधबा, खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी वृक्षांच्या सान्निध्यात वॉकिंग ट्रक उपलब्ध होणार आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. त्यातील एक भाग म्हणजे झिरो किलोमीटर कऱ्हाडचे शिल्प. हे शिल्प आता सर्वांना आकर्षित करणार आहे. 

पालिकेने तेथे राबविलेला घनकचरा विघटन प्रकल्प त्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. दररोज येणारा नवा व तेथेच असलेला जुना कचऱ्याचे विघटन करून तो कचरा कंपोस्ट खतात रूपांतरित केला जात आहे. असे चाळीस फूट उंचीचे पाच ते सहा ढिगारे नाहीसे झाले आहेत. तेथे कंपोस्ट खत व बायोगॅसवर पंधरा एकरांत ट्यूब चालवल्या आहेत. 

काय आहे, झीरो किलोमीटर कऱ्हाड 
शहरातील प्रीतिसंगम बाग, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे समाधिस्थळ, नकट्या रावळ्याची विहीर, उंच मनोरे, संत सखूचे मंदिर, कृष्णाबाई घाट, छत्रपती शिवाजी स्टेडियम, यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, छत्रपती शिवाजी महाराजा यांचा अश्वारूढ पुतळा, ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांचे स्मृतिस्थळ यासह स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत साकारलेला आय लव्ह कऱ्हाड सेल्फी पॉइंट अशी सर्व माहिती घेण्यापूर्वी झिरो किलोमीटर कऱ्हाड शिल्पास पर्यटकांना भेट द्यावी लागणार आहे. शहरातील विविध स्थळांची पाहणी करण्याच्या उद्देशाने कचरा डेपोचे बागेत रूपांतर केले आहे. तेथेच झिरो किलोमीटर कऱ्हाड शिल्प आहे. या शिल्पाचा लवकरच लोकार्पण सोहळा होणार आहे. कऱ्हाडचा जो भाग दुर्गंधीयुक्त आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याने व्यापला होता, तो खरंतर कऱ्हाडकरांसाठी शून्य होता आणि म्हणूनच त्या ठिकाणी सुंदर बाग आणि त्या बागेत झिरो किलोमीटर कऱ्हाडचे शिल्प बनवले गेले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com