सातारा : भक्ती-शक्तीच्या उत्सवास प्रारंभ

घरोघरी घटस्थापनाही, विविध धार्मिक कार्यक्रम
satara
satarasakal

सातारा : ढोल-ताशांचा गजर, भगव्या टोप्या घालून भगवे झेंडे फडकावत आई जगदंबेचा घोष करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात मिरवणुका काढून आदिमाया आदिशक्ती देवी भगवती आई जगदंबेच्या उत्सवमूर्तींची प्रतिष्ठापना केली. घरोघरी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास आज उत्साहात प्रारंभ झाला. नऊ दिवस भक्ती आणि शक्तीच्या पूजेबरोबरच संगतीच्या तालावर रासगरबा आणि दांडियाच्या खेळात तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत राहणार आहे.

जिल्ह्यात नवरात्र उत्सवास घटस्थापनेने उत्साहात प्रारंभ झाला. शहरात सकाळपासूनच सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गामातेच्या उत्सवमूर्तींची मिरवणुका काढून प्रतिष्ठापना केली. ढोलताशांच्या गजरात आणि फुलांच्या उधळणीत मिरवणुका काढण्यात आल्या. जिल्ह्यात सार्वजनिकरीत्या हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ग्रामीण भागात अनेक मंडळांनी फुलांच्या सजावटीत आज मूर्तींची प्रतिष्ठापना केली. विविध मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांचे, तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. दरम्यान, विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आज तुळजापूर, प्रतापगडावरील भवानीमाता, अजिंक्‍यताऱ्यावरील मंगळाई, औंधची यमाई, कोल्हापूरची अंबाबाई अशा विविध शक्तिस्थानावरून शक्तिज्योती प्रज्वलित करून आणल्या. मूर्तींची विविध वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून प्रतिष्ठापना करत कार्यकर्ते देवी जगदंबेचा जयजयकार करत होते. सायंकाळी उशिरापर्यंत मूर्तींची प्रतिष्ठापना विधिवत केली जात होती.

कऱ्हाडला दिमाखात दुर्गामूर्तींची प्रतिष्ठापना

कऱ्हाड : मांगल्याचे, चैतन्याचे व उत्साहाचे प्रतीक असलेल्या नवरात्रोत्सवाला आजपासून येथे दिमाखात प्रारंभ झाला. आदिशक्तीचे जल्लोषात स्वागत करण्यात येऊन सायंकाळच्या सुमारास वाद्यांच्या गजरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात भक्तिभावाने स्थापना करण्यात आली. या वेळी काढण्यात आलेल्या काही मंडळांच्या मिरवणुकांनी लक्ष वेधून घेतले. सकाळपासूनच बाजारात भाविकांची घट व देवीच्या मूर्ती घेण्यासाठी गर्दी झाली होती. बांगड्या, चुनरी, हार, धान्यपुडी, दागिन्यांना मागणी होती. सकाळी घरातील घटस्थापना झाल्यानंतर दुपारनंतर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या मूर्तींची वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कुंभारवाडा आणि शहरातील चौकात बंदोबस्त तैनात केला होता.

पाटणला पारंपरिक वाद्यांचा गजर

पाटण : पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि दुर्गामाता की जयच्या जयघोषात आज दुर्गादेवींची पाटण तालुक्यातील विविध दुर्गादेवी मंडळांनी भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना केली. दिवसभर पाटणच्या कुंभारवाड्यातून दुर्गादेवी मूर्ती घेऊन जाण्यासाठी महिलांसह भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती. आज पाटणचा आठवडा बाजार असल्याने झेंडा चौक, लायब्ररी चौक ते कुंभारवाडा अशी व मूर्ती घेतल्यानंतर बैल बाजार मैदानमार्गे बाजार समिती रस्त्यावरून केरा पूल अशी व्यवस्था पोलिस निरीक्षक निग्रज चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण पोलिसांनी केली होती.

अनवाणी व्रत, उपवास दांडिया अन् तरुणाई

नवरात्राची उत्सुकता तरुण वर्गात मोठी असते. ते भक्ती करतानाच उत्सवात आपल्या उत्साहालाही वाट करून देतात. अनेक युवक- युवती नवरात्रात पायात चप्पल न घालण्याचे व्रत जपतात. कडक उपवासही करतात. अगदी कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थीही हे व्रत निष्ठेने पूर्ण करतात, तसेच नवरात्रात संगीताच्या तालावर रास गरब्यात तरुणाई थिरकत राहते. शहरात आणि ग्रामीण भागातही रास दांडिया, गरबाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. काही मंडळानी मोठी बक्षिसे जाहीर करत रास दांडियाच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com